उस्‍मानाबाद लोकसभेच्‍या जागेसाठी शिवसेनेने जिल्‍हाप्रमुख तथा माजी आमदार प्रा. रविंद्र गायकवाड यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली असून तशा प्रकारचा संकेत मिळाल्‍याने प्रा. रविंद्र गायकवाड यांनी लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु केली आहे.
    लोकसभेच्‍या निवडणुका कुठल्‍याही क्षणी होणार असल्‍याची शक्‍यता गृहीत धरून सर्वच राजकीय पक्षांकडून सध्‍या जोरदार तयारी सुरू आहेत. उस्‍मानाबाद लोकसभेची जागा शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीमध्‍ये शिवसेनेकडे आहे. उस्‍मानाबाद जिल्‍ह्यात लोकसभा निवडणुकीत युतीचे चांगलेच वर्चस्‍व आहे. मागील‍ निवडणुकीत युतीचे प्रा. रविंद्र गायकवाड व कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्‍यात अतिशय चुरशीची लढत झाली होती. या लढतीमध्‍ये जिल्‍ह्यातील सर्व सत्‍तास्‍थाने कॉंग्रेस व राष्‍ट्रवादीच्‍या ताब्‍यात असतानाही डॉ. पद्मसिंह पाटील यांचा अतिशय कमी मताधिक्‍क्‍याने विजय झाला होता. शिवसेनेचे प्रा. रविंद्र गायकवाड यांनी खा.डॉ.पद्मसिंह पाटील यांना विजय मिळविण्‍यासाठी अक्षरशः झुंजविले होते. बार्शी तालुक्‍याने प्रा. रविंद्र गायकवाड यांना थोडी साथ दिली असती तर उस्‍मानाबाद लोकसभेच्‍या निवडणुकीचा निकाल वेगळा लागला असल्‍याचे दिसून आले असते.
    शिवसेना पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे यांनी पुन्‍हा एकदा उस्‍मानाबाद लोकसभेच्‍या जागेसाठी शिवसेनेचे जिल्‍हाप्रमुख प्रा. रविंद्र गायकवाड यांची उमेदवारी जवळपास निश्चित केली असल्‍याचे समजते. यावेळेस शिवसेनेकडून दोन ते तीन नावांची चर्चा सुरु होती. मात्र काही दिवसांपूर्वीच या संदर्भात मुंबई येथे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्‍दव ठाकरे यांच्‍या उपस्थितीत पार पडलेल्‍या बैठकीत सर्वानुमते उस्‍मानाबाद लोकसभेच्‍या जागेसाठी प्रा. रविंद्र गायकवाड यांचे नाव जवळपास निश्चित केले आहे. या बैठकीस उस्‍मानाबाद जिल्‍ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी, उपजिल्‍हाप्रमुख, सर्व तालुकाप्रमुख उपस्थित होते. उमदेवारी निश्‍चित असल्याचे संकेत मिळाल्‍याने प्रा. गायकवाड यांनी जिल्‍हाभर दौरे काढून लोकसभेच्‍या निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.
    शिवसैनिकांना मोबाईलवरुन संदेश पाठवून शिवसैनिकांनी लोकसभेच्‍या निवडणुकीसाठी तयार राहण्‍याचे आवाहन सध्‍या मोबाईलवरुन करण्‍यात येत आहे. त्‍यामुळे शिवसेनेने यावेळेस कुठल्‍याही परिस्थितीत उस्‍मानाबाद लोकसभेच्‍या जागेवर विजय मिळविण्‍याचा चंग बांधला असल्‍याचे दिसून येत आहे. मात्र यासाठी प्रा. रविंद्र गायकवाड यांना बरेच परिश्रम घ्‍यावे लागणार आहेत. कारण तुळजापूर, उस्‍मानाबाद, बार्शी या ठिकाणी शिवसेनेला मताधिक्‍य मिळविण्‍यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. तुळजापूर तालुक्‍यात शिवसेनेची सध्‍याची अवस्‍था अतिशय वाईट आहे. याचे कारण म्‍हणजे विधानसभा निवडणुकीसाठी तुळजापूर विधानसभेची जागा आतापर्यंत शिवसेनेकडे होती. मात्र मागच्‍या निवडणुकीपासून ही जागा महायुतीच्‍या जागा वाटपात भाजपाकडे गेली आहे. याचा मोठा परिणाम शिवसैनिकांवर झाला असून नाराज शिवसैनिक यामुळे राजकारणात स‍क्रीय नसल्‍याचे दिसून येत आहे. त्‍यामुळे प्रा. गायकवाड यांना सध्‍या शिवसेनेत जी मरगळ झाली आहे, ती दुर करुन शिवसैनिकांमध्‍ये चैतन्‍य निर्माण करावे लागणार आहे. त्‍याचबरोबर मित्रपक्ष असणारे भाजपा व रिपाइं या पक्षाच्‍या पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांना विश्‍वासात घेवुन त्‍यांना निवडणुकीची महत्‍त्‍वाची जबाबदारी सोपवावी लागणार आहे. सध्‍याची परिस्थिती पाहता, जनमताचा कौल हा शिवसेना-भाजपा-रिपाइं महायुतीच्‍या बाजूने असून युतीने व्‍यवस्थित आतापासूनच निवडणुकीचे योग्‍य नियोजन करुन लोकसभा निवडणुक लढविली तर त्‍यांना या मतदार संघात विजय मिळविणे अवघड जाणार नाही.
 
Top