बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवून सुरु असलेल्या बार्शीतील शाळेची मान्यता रदद करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिल्याने संस्थाचालकांना चपराक बसली आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, बार्शी येथील भगवंत शिक्षण मंडळ संचलित मराठी विदयालय ही प्राथमिक शाळा मागील अनेक वर्षापासून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेताना कसल्याही प्रकारची भोतिक सुविधा न देता अधिका-यांशी हातमिळवणी सुरु होती.
    याबाबत अनेक तक्रारी दाखल होवूनही कसलीही कारवाई करण्यात न आल्याने तक्रारदाराने शेवटी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सुनावणी होवून आदेश काढण्यात आले. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या शाळेची मान्यता काढल्याचे पत्र शिक्षण संचालक, पुणे तसेच विभागीय शिक्षण उपसंचालक, पुणे यांनी काढून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
    आरटीई कायदयानुसार सदरच्या संस्थेला सुधारणा करण्याची संधीही देण्यात आली. परंतु संधी देवूनही कसलीही भौतिक सुविधा उपलब्ध न केल्याने सदरच्या शाळेची फेर तपासणी करताना आढळलेल्या दोषांनुसार कारवाई करण्यात आली. शाळेची मान्यता काढण्यात आल्याचे व त्यानुसार वर्तमानपत्रात जाहीर प्रकटन करुन पालकांनी या शाळेत प्रवेश घेवू नये, असे आवाहन करण्यात यावे, असेही शिक्षण उपसंचालक, पुणे यांच्या आदेशात म्हटले आहे. सदरची प्रत शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सोलापूरन यांना देण्यात आली असून त्यानुसार नगरपालिका शिक्षण मंडळाने मुख्याध्यापिका मराठी विदयालय यांच्या नावे कारवाईचे पत्र दिले आहे.

 
Top