
जागतिक हिंदु संमेलनात विविध ठिकाणाहून अनेक हिंदु नेत्यांनी जागतिक स्तरावर हिंदूंना भेडसावत असलेल्या समस्या आणि त्यांवरील उपाययोजना, यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी जागतिक हिंदु परिषदेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रा. मेदभक्त यांनी जागतिक स्तरावरील हिंदूंची पत सुधारण्यासाठी परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील, अशी घोषणा केली. हिंदूंसाठी स्वतंत्र अशी आर्थिक व्यवस्था नाही. हिंदूंसाठी स्वतंत्र अशा आर्थिक पायाभूत सुविधांची म्हणजे हिंदु अधिकोषाची निर्मिती करणे आवश्यक आहे, असे वक्तव्य संजीव स्वहने यांनी परिषदेत व्यक्त केले.
या संमेलनात हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी हिंदु धर्माची महती, हिंदु संस्कृती टिकवण्यासाठी करावयाचे प्रयत्न आणि हिंदूंनी धर्माचरण करण्याची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, हिंदु धर्मात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ सांगितले आहेत. पाश्चात्त्यांची जीवनपद्धती केवळ अर्थ आणि काम अन् अंशतः धर्म यांवर अवलंबून आहे. हिंदु धर्म सोडून इतर धर्मांमध्ये मोक्ष ही संकल्पनाच नाही. त्यामुळे भोग आणि लोभ यांचे प्राबल्य वाढून त्यांना अंतिमत: दुःखालाच सामोरे जावे लागत आहे. पाश्च्यात्त्य संस्कृतीचा अंगीकार केल्याने सांप्रतचे मानवी जीवन अतिशय दुःखी झाले आहे. पाश्चात्त्य देशांत ५० टक्के नागरिकांना आयुष्यात कधीतरी मानसोपचार घ्यावे लागतात. त्यांच्यासमोर दुसरा कुठलाही मार्ग उपलब्ध नाही. याउलट सुखस्य मूलं धर्मः। 'म्हणजे हिंदु धर्मानुसार आचरण हेच सुखाचे मूळ आहे.' म्हणूनच विदेशातील आता शाकाहार, ध्यानधारणा, योग, प्राणायाम, आयुर्वेद आदी हिंदु धर्मातील तत्त्वज्ञान आचरत आहेत आणि त्यामुळे त्यांचे जीवन आनंदी बनत आहे; म्हणूनच जगभरात पसरलेल्या हिंदूंनी आनंदाचे मूळ हिंदु धर्मानुसार आचरण करण्यात आहे. हे लक्षात घेऊन धर्माचरण करायला हवे, असेही त्यांनी शेवटी सांगितले.