मुंबई -: ज्येष्ठ अभिनेते प्राण उर्फ प्राण किशन सिकद यांचे शुक्रवार दि. 12 जुलै रोजी  लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टीतील एक देखणा खलनायक काळाच्या पडद्याआड गेला आहे. दरम्यान, त्यांच्या पार्थिवावर शिवाजी पार्क येथे आज शनिवार दि. 13 जुलै रोजी दुपारी १२ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे समजते.
      आपल्या अभिनयाने प्रत्येक भूमिकेत जान ओतणारे ज्येष्ठ अभिनेते
प्राण ऊर्फ प्राण कृष्ण सिकंद यांचे (93) लीलावती रुग्णालयात निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते. संगीताच्या सुवर्णयुगात सुरुवातीला नायक व नंतर आपल्या खलनायकी अभिनयाने नवा दरारा निर्माण करणारा अभिनेता म्हणून प्राण यांची ओळख होती. केवळ खलनायकच नव्हे तर विविध चरित्र व्यक्तिरेखा त्यांनी पडद्यावर सकस अभिनयाने सादर केल्या. त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. खानदान, हलाकू, मधुमती, जिस देश में गंगा बहती है, उपकार, शहीद, आँसू बने अंगारे, जॉनी मेरा नाम, व्हिक्टोरिया नं.203, बेइमान, जंजीर, डॉन आणि दुनिया चित्रपटांतील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. कला क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 2001 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. तर चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना 10 मे 2013 रोजी गौरवण्यात आले.
    दिल्लीतील बल्लीमरन भागात 12 फेब्रुवारी 1920 रोजी प्राण यांचा जन्म झाला. त्याचे वडील स्थापत्य अभियंता होते. शाळेत असताना प्राण यांनी गणित विषयात चमक दाखवली. ‘रामलीला’तून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. प्रसिद्ध लेखक वली मोहंमद वली यांच्याशी झालेल्या ओळखीतून प्राण यांना रुपेरी पडद्यावर संधी मिळाली. ‘यमला जाट’ या पंजाबी चित्रपटानंतर ‘खानदान’मधून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.
    मुंबई, नवी दिल्ली २ गेल्या सहा दशकांपासून आपल्या कसदार अभिनयाने रसिकांच्या हृदयात मानाचे स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते प्राण यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर ट्विटर तसेच इतर माध्यमांतून मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

अनेक पिढ्यांचे मनोरंजन करणारा नायक हरपला. शेकडो व्यक्तिरेखांच्या माध्यमातून प्राण कायम रसिकांच्या लक्षात राहतील.
- डॉ. मनमोहनसिंग, पंतप्रधान

अनेकविध भूमिकांतून प्राण यांनी रसिकांचे मनोरंजन केले. त्यांची सहा दशकांची कारकीर्द नेहमी आठवणीत राहील. ‘जंजीर’ मधला त्यांचा शेरखान कायम स्मरणात राहील.
- पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री

भारतीय चित्रपटसृष्टीचा प्राण हरपला.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

‘उपकार’चा मलंग चाचा, ‘जंजीर’मधील शेरखान निव्वळ अविस्मरणीय ! प्राणसाहेबांच्या निधनाने अतीव दु:ख झाले. भारतीय चित्रपटसृष्टीतील ते क्रांतिकारी खलनायक होते.
- मधुर भांडारकर, दिग्दर्शक

प्राण यांनी साकारलेला शेरखान विसरणे केवळ अशक्य आहे. प्राणसाहेब अजरामर राहतील.
- रितेश देशमुख, अभिनेता

मी प्राण यांना व्यक्तिश: भेटले नसले तरी त्यांच्याबाबत खूप ऐकून होते. ते एक सहृदयी व्यक्तिमत्त्व होते.
- प्रीती झिंटा, अभिनेत्री

एक सच्च नायक आणि सज्जन गृहस्थ अशी ओळख असणारे सर्वांचे लाडके अभिनेते काळाच्या पडद्याआड गेले.
- अनुपम खेर, चरित्र अभिनेते

भारतीय चित्रपटातील खलनायकांचा बादशहा हरपला. त्यांच्या भूमिका रसिकांच्या कायम स्मरणात राहतील. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी पडद्यावर हुकूमत गाजवली.
- कबीर बेदी, चरित्र अभिनेते

प्राण यांच्या जीवनप्रवासावर एक नजर टाकुया..
1.. प्राण यांचे वडील लाला केवल कृष्ण सिकंद सरकारी ठेकेदार होते. देहरादूनजवळील कलसी पूल प्राण यांच्या वडिलांनीच तयार केला आहे. नोकरीमुळे वडिलांची सतत बदली होत असल्यामुळे प्राण यांचे शिक्षण कपूरथला, उन्नाव, मेरथ, देहरादून आणि रामपूर या शहरांमध्ये झाले.
2.... प्राण यांचे लग्न १९४५ साली झाले होते. भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर प्राण आपली पत्नी सुलेखा, मुलगा अरविंद-सुनील आणि मुलगी पिंकी यांच्यासमवेत मुंबईत स्थायिक झाले. त्यांना पाच नातवंड आणि २ पणतू आहेत.
3... प्राण नशीबानेच चित्रपटसृष्टीत आले. त्यांनी लाहोरमध्ये फोटोग्राफर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. मात्र १९४० नंतर त्यांचे नशीब पालटले. त्यांना 'यमला जट' या पंजाबी सिनेमात पहिल्यांदा अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
4.. प्राण यांनी ३५० हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. प्राण यांना उपकार (१९६८), आँसू बन गये फूल (१९७०) आणि बेईमान (१९६८) या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. याशिवाय अनेक पुरस्कार त्यांच्या नावी आहेत. भारतीय सिनेमातील योगदानाबद्दल त्यांना २००१ साली भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.
5.. प्राण यांनी सहा दशकांहून अधिक काळ सिनेमांमध्ये अभिनय केला. २००२ साली आलेला तुम जीओ हजारों साल या सिनेमात प्राण शेवटचे झळकले होते. 'बाल ब्रम्हचारी' या सिनेमाद्वारे खलनायक म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली होती. त्यानंतर जंजीर, कर्ज, डॉन या सिनेमांमध्ये त्यांनी विविधांगी भूमिका साकारल्या.
6.... प्राण यांचा अभिनय एवढा दमदार होता की 'राम और श्याम' या सिनेमानंतर प्रेक्षक खासगी आयुष्यातसुद्धा त्यांच्याकडे व्हिलन म्हणूनच बघू लागले होते. मात्र 'उपकार' या सिनेमातील मंगल चाचा या भूमिकेनंतर प्रेक्षक त्यांचे चाहते बनले.
7....फोटोग्राफी आणि अभिनयाबरोबर प्राण यांना खेळातही विशेष आवड होती. ५०च्या दशकात प्राण यांचा 'डायनॉमोस फुटबॉल क्लब' बराच चर्चेत होता.

 
Top