उस्मानाबाद -: कारगील विजय दिनानिमित्त जिल्ह्यात आज या युद्धात शौर्य गाजवून धारातीर्थी पडलेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नगरपरिषदेच्या हुतात्मा स्तंभास आज सकाळी जिल्हाधिकारी डॅा. के.एम. नागरगोजे, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, प्रभारी नगराध्यक्ष अमित शिंदे, मुख्याधिकारी अजय चारठाणकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर निवृत्त सुभाष सासणे आदींनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
      देशाच्या कारगिल भारत सन 1999 मध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेले आक्रमण भारतीय शुर सैनिकांनी त्यांच्या साहसाने व धाडसाने खांद्यास खांदा लावून शत्रुशी झूंज देवून यशस्वीरित्या परतावून  लावले. या युध्दास आज 14  वर्षे पुर्ण झाली. कारगिल युध्दात शहीद झालेल्या शूर सैनिकाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत सरकारने ऑपरेशन विजय हा कारगिल विजय स्मृति दिवस म्हणून साजरा करत आहे.
         ऑपरेशन विजय युध्द संग्रामात देशातील एकूण 517 अधिकारी/ जवान शहीद झाले असून 1251 अधिकारी व जवान घायाळ होवून कायम अपंगत्व  पदरी पडलेले आहे. महाराष्ट्राने स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय लष्काराचे महत्वाचे योगदान दिलेले आहे. शैार्याची  व त्यागाची परंपरा असलेल्या आपल्या राज्यातील विविध शहिदांनी सन 1962, 1965 व 1971 च्या युध्दामध्ये व इतर विविध युध्दजन्य परिस्थतीत सक्रीय भाग घेवून कोटयावधी भारतीयांच्या संरक्षणासाठी प्राणाची पर्वा न करता विशेष उल्लेखनीय शौर्याचा पराक्रम केले आहे. दि.1 मे 1995 ते 30 एप्रिल 1999 या काळात आपल्या राज्यातील एकुण 114 वीर योध्दांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. कारगिल युध्दानंतर सुध्दा महाराष्ट्राची शौर्यगाथा कायम राखण्यासाठी आजपर्यंत 247 शहीदांनी सर्वस्वाचा त्याग करुन महाराष्ट्राची परंपरा कायम राखली आहे.
       या परंपरेला वंदन  करण्यासाठी आज शहरात विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. सकाळी विविध शाळांमधून शालेय विद्यार्थ्यांनी प्रभातफेरी काढून या वीर जवानांचे  स्मरण केले.  यानिमित्त चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
      जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर सासणे यांच्यासह सैनिक कल्याण कार्यालयातील एस.जी. बिराजदार, एम.एम.कानगुले, के.डी.कंगारे, राजेंद्र साळुंखे,महादेव सुतार, रमेश गलांडे, टी.एन. वाघमारे, के. एन. सुरवसे आदिंनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.       
 
Top