उस्मानाबाद - चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा पेटवून देऊन खून केल्याप्रकरणी पतीस उस्मानाबाद येथील सत्र न्यायाधीश शशिकांत कुलकर्णी यांनी जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड सुनावला.
    खेड येथील बापू कोळी हा पत्नी वर्षा व दोन आपत्यांसह काक्रंबा (ता. तुळजापूर) येथील विटभट्टीवर मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. बापू कोळी हा सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे. यातूनच 24 जानेवारी 2012 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास वर्षा कोळी लघुशंकेसाठी उठून बाहेर जात असताना पती बापू कोळी याने पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यावेळी केलेल्या आरडाओरडीमुळे मदतीस आलेल्या शेजारच्या नागरिकांनी पाणी ओतून आग विझवत गंभीर जखमी झालेल्या वर्षा यांना उस्मानाबाद शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी वर्षा यांनी पती बापू कोळी याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा जबाब रुग्णालयातील पोलिस कर्मचारी आर. ए. फुलारी यांच्याकडे नोंदविला. सदरच्या जबाबावरू न तुळजापूर पोलिस ठाण्यात बापू कोळी याच्याविरोधात कलम 498 अ, 302 भादंविनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाचा तपास करून पोलिस उपनिरीक्षक एस. एन. साबळे यांनी तुळजापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्‍यांसमोर दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणाची उस्मानाबाद येथील सत्र न्यायाधीश शशिकांत कु लकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकार पक्षाच्या वतीने 6 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये जबाब घेणा-या पोलिस नाईक फुलारी व डॉ. बी. एम. साबळे यांची साक्ष महत्वाची ठरली. यावेळी समोर आलेला पुरावा व सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता पी. वाय. जाधव यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायाधीश कुलकर्णी यांनी आरोपी बापू कोळी यास जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. तसेच दंड न भरल्यास आणखी एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
 
Top