उस्मानाबाद -: नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 5 मधील रेविता माणिक बनसोडे यांची शुक्रवार दि. 26 जुलै रोजी बिनविरोध निवड झाली. नगरपालिकेच्या स्थापनेनंतर (1958) पहिल्यांदाच बौद्ध समाजाला नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी क रीत गुलाल व निळ्या रंगाची उधळण करून जल्लोष केला.
        पालिकेचे अध्यक्षपद पहिल्या अडीच वर्षांसाठी एससी महिलेसाठी राखीव आहे. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीच्या सरस्वती घोणे यांची नगराध्यक्षपदावर निवड करण्यात आली होती. राष्ट्रवादीच्या अंतर्गत करारानुसार नगराध्यक्षा सरस्वती घोणे यांनी राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष निवडीसाठी शुक्रवार दि. 26 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पालिका सभागृहात बैठक घेण्यात आली. या पदासाठी रेविता बनसोडे यांचा एकमेव अर्ज आला होता. त्यामुळे निवडणूक निर्णयाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी बनसोडे बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केले. विजयाची घोषणा होताच, सर्मथकांनी एकच जल्लोष केला.

स्वीकृत सदस्यपदी पवार, शेख


शुक्रवार दि. 26 जुलै रोजी दोन स्वीकृत नगरसेवकांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे राजाभाऊ पवार आणि अय्याज हारूण शेख यांची निवड झाली आहे. या दोघांसह या पदासाठी नऊ अर्ज दाखल झाले होते. यामध्ये फिरोज खाँ पठाण, कादरखाँ पठाण, प्रसाद जोशी, रमन जाधव, नारायण तरूप, विलास पवार, र्शीहरी गवाड यांचेही अर्ज आले होते. तर रमन जाधव, नारायण तरूप, विलास पवार, र्शीहरी गवाड यांचा अर्ज अवैध ठरला. उर्वरित तिघांनी माघार घेतल्याने पवार व शेख यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. निवडणूक निर्णयाधिकारी म्हणून उपविभागीय दंडाधिकारी प्रशांत सूर्यवंशी, साहाय्यक म्हणून तहसीलदार सुभाष काकडे, मुख्याधिकारी अजय चारठणकर यांनी काम पाहिले.
 
Top