मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विचार राज्यालाच नव्हे तर देशाला दिशा देणारे आहेत. त्यांची महत्वाची भाषणे इंग्रजीत भाषांतरित करावीत. त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा लाभ इतर भाषेतील लोकांनाही घेता येईल, असे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितले.
       कुलाबा येथील डॉ.होमी भाभा सभागृह, टाटा इन्स्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर), नेव्ही नगर येथे स्व.वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल के.शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय कृषी मंत्री आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री शरद पवार, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय कृषी राज्यमंत्री तारिक अन्वर, केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम राज्यमंत्री प्रफुल्ल पटेल, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, राजशिष्टाचार मंत्री डॉ.सुरेश शेट्टी, सामान्य प्रशासन राज्यमंत्री प्रा.फौजिया खान आणि वसंतराव नाईक यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.
    राष्ट्रपती म्हणाले, स्व.वसंतराव नाईक यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून भरीव कामगिरी केली. त्याच प्रमाणे देशाच्या राजकारणाला दिशा देण्याचेही काम त्यांनी केले. त्यांनी राज्यात राबविलेल्या रोजगार हमी योजनेला आता राष्ट्रीय स्तरावर महत्व प्राप्त झाले आहे. त्यांची कारकीर्द केवळ काळानेच मोठी नव्हती तर इतर अनेक कारणांमुळे महत्वाची ठरली. त्या काळात संपूर्ण देशात राजकीय अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले होते, असे असतानाही महाराष्ट्रात स्व.नाईक यांनी राजकीय आणि आर्थिक स्थैर्य स्थापित करुन दाखविले. नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्याला अनेक मौल्यवान सूचना केल्या असल्याचे सांगून राष्ट्रपती म्हणाले, पहिल्या तीन योजनांमध्ये असलेल्या अडचणी दूर करुन चौथ्या योजनेच्या वेळी गाडगीळ समितीच्या सल्ल्यानुसार सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यांच्याशी विचार विनिमय करुन प्रत्येक राज्याचे प्रश्न निराळे असल्याचे लक्षात आल्याने प्रत्येक राज्यासाठी वेगळे नियोजन करण्यात आले.
      वसंतराव नाईक यांनी अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले. त्यांनी स्थापन केलेली कृषी विद्यापीठे ही मोठी घटना आहे. गेल्या चार दशकात या कृषी विद्यापीठांमुळे शेतकऱ्यांना फायदा होऊन राज्याला अन्न धान्याच्या बाबतीत समृद्धी मिळण्यास मदत झाली. नव्या हरितक्रांतीची सुरुवात करुन त्यांना खरी श्रद्धांजली वाहता येईल, असेही श्री.मुखर्जी यावेळी म्हणाले.


वसंतराव नाईक जन्मशताब्दी निमित्ताने...


     वसंतराव नाईक जन्मशताब्दी सोहळ्याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले, वसंतराव नाईक यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परभणी येथील कृषी विद्यापीठाला वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ असे नाव देण्याचा निर्णय झाला आहे. स्व.नाईक यांच्या जन्म गावी गहूली येथे दोन कोटी रुपये तर पुसद येथे सहा कोटी रुपये खर्च करुन त्यांचे स्मारक तयार करण्यात येणार आहे. या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचे चौपदरी करण करुन झाडे लावण्यात येणार आहेत. स्व.वसंतराव नाईक यांनी शिक्षण घेतलेल्या नागपूर येथील मॉरीस कॉलेज परीसरात 1750 आसन क्षमतेचे सभागृह व त्यांच्या जीवनावरील संग्रहालयाचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच या कॉलेजच्या परीसरातील मुलींच्या वसतीगृहांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 20 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय जलसंधारण, रोजगार हमी योजना या विषयांवर राष्ट्रीय परीसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने नागपूर येथे राष्ट्रीय कृषी प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.
      केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी स्व.वसंतराव नाईक यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले, त्यांच्या काळात राज्यमंत्री म्हणून गृह, सामान्य प्रशासन व मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या इतर विभागांचे कामकाज पाहण्याची संधी मला मिळाली. या काळात नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. स्व.नाईक यांनी कापूस एकाधिकार योजना, चार कृषी विद्यापीठे, अन्न धान्यांसंबंधी धोरण असे अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. अन्न धान्याची अडचण निर्माण झाली असता पुणे येथील शनिवार वाडा येथे त्यांनी घोषणा केली ‘येत्या दोन वर्षात राज्याला अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले नाही तर याच शनिवार वाड्यावर मला फाशी देण्यात यावी’. केवळ घोषणा देऊन ते थांबले नाही तर अखंड व टोकाचे प्रयत्न करीत त्यांनी राज्याला अन्न धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्णतेकडे नेले. सहकाऱ्यांना सतत प्रोत्साहित करणारे आणि शेतीत राबणाऱ्या सामान्य शेतकऱ्यांचाही सन्मान करणारे वसंतराव नाईक यांनी राज्याच्या चौफेर प्रगतीसाठी सतत प्रयत्न केले.

     केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले, वसंतराव नाईक यांच्या आशिर्वादमुळेच आपण राज्याचे मंत्रिमंडळ ते देशाचे गृहमंत्री पद असा प्रवास करु शकलो. गोरगरीबांचा विचार करणारा आणि सामान्यांना न्याय मिळवून देणारा असा नेता पुन्हा होणे नाही.

      हरित क्रांतीचे प्रणेते आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.वसंतराव नाईक यांच्या बहुमुखी व्यक्तीमत्वामुळे आणि दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र आज प्रगतीपथावर जात आहे, असे प्रतिपादन प्रफुल्ल पटेल यांनी केले.

       आपल्या स्वागतपर भाषणात अजित पवार म्हणाले, राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने मोठ्या प्रमाणात उत्सव साजरे करता आले नाहीत याचा खेद आहे. वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्यासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली तसेच स्व.वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचे भाग भांडवल 200 कोटी रुपयांवरुन 500 कोटी रुपये करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

      यावेळी शंकर बारवे दिग्दर्शित ‘कृषी औद्योगिक क्रांतीचे जनक-वसंतराव नाईक’ हा लघुपट दाखविण्यात आला. जेष्ठ पत्रकार नागेश केसरी यांनी संपादित केलेले वसंतराव नाईक यांचे चरित्र प्रकाशित करण्यात आले तर टपाल खात्यामार्फत वसंतराव नाईक यांचे छायाचित्र असलेल्या पाकिटाचे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राज्यशिष्टाचार मंत्री डॉ.सुरेश शेट्टी यांनी केले.
 
Top