बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील साई उमाकांत महंकाळे हा दहा वर्षाचा मुलगा शौचासाठी घराबाहेर पडल्यावर आठ ते दहा कुत्र्यांनी हल्ला करुन त्यास जखमी केले. तळयाच्या जवळील येडाई विहीरीजवळ शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला असून उपचारासाठी त्याला जगदाळेमामा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
    साई महंकाळे हा प्राथमिक विदयामंदीर येथील विदयार्थी असून शनिवारी पाऊस येत असल्याने तो शाळेत गेला नाही. त्याच्यावर हल्ला झाल्याचे तसेच त्याला काही कुत्री चावा घेवून  फरफटत ओढून नेत असल्याचे त्याच्या नातेवाईक असलेल्या सुरज कडवे याने पाहिले. समयसूचकता व वेळेचे भान राखून सुरजने साईकडे धाव घेतली. हातामध्ये दगड घेवून तसेच त्या कुत्र्यांच्या मध्ये पडून साईला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. सदरच्या प्रकारानंतर इतरांनीही धावून कुत्र्यांपासून त्यांची सुटका केली.
    सदरच्या प्रकारामध्ये साईच्या मांडीला, मानेजवळ, डाव्या हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. फरफटत गेल्यामुळे पाठला जखम झाली आहे. जगदाळे मामा रुग्णालयात डॉ. कुलकर्णी व डॉ. पोकळे यांनी त्याच्यावर उपचार केले आहेत.
    याबाबत बोलताना साई महंकाळेचे नातेवाईक काही अंतरावर असलेल्या कत्तलखान्यामुळे जनावरांचे मांस खाऊन कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. सदरच्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. एकाच वेळी 30 ते 40 कुत्र्यांचा कळप बाहेर पळत असल्याचे चित्र नेहमी दिसते. सातत्याने हिंस्त्रपणे अनेकांवर हल्ले करत आहेत. नगरपालिकेच्या मुख्याध्याधिकारी व आरोग्याधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता आमच्याकडून याला काही करता येत नाही. आम्हाला कुत्री मारायला बंदी आहे, याबाबत काही होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले.
    याचप्रकारे बार्शी तालुक्यातील सौंदरे येथील एका मुलाला पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने जगदाळे मामा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रविवारी बहुतेक डॉक्टर्स उपलब्ध नसतात त्यामुळे त्याला दुस-या दिवशी बोलावण्यात आले.  सोमवारी त्याला या ठिकाणी उपचाराची सुविधा मिळाली नसल्याने सोलापूर येथील सिव्हील हॉस्पिटल येथे घेवून जाण्याचे सांगण्यात आले.
    अनेक ठिकाणी कुत्र्यांची संख्या झपाटयाने वाढली आहे. नगरपालिकेच्यावतीने कुत्र्यांची नसबंदी केल्याचे सांगण्यात येते. परंतु त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. मोकाट कुत्र्यांनी माणसांनाच काय पण बंदूकधारी पोलिसांनाही हैराण करुन सोडले आहे. हातात बंदूक अथवा काठया असल्या तरी पोलिसांना या कुत्र्यांपासून प्रचंड भिती निर्माण झाली आहे. हत्यारे चालविण्याची परवानगी नाही आणि कुत्र्यांपासून भीती कमी होत नाही.
    मध्यंतरी तर त्याहून कहर झाला होता. राज्यभर गाजलेल्या सोलापूर महापालिकेतील कुत्र्यांच्या रेबीज इंजेक्शनऐवजी केवळ साध्या पाण्याचे इंजेक्शन देण्यात येत असल्याचे उघड झाले होते. त्यामुळे अगोदरच नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड असंतोष असताना बार्शी नगरपालिकेचे कुत्र्यांच्या संख्येकडे दुलैक्ष होत आहे. शासनाच्या कुत्र्रयांना मारु नका, या आदेशावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. कुत्रे महत्त्वाची की माणसे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
Top