मुंबई –: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणा-या दहावी, बारावीच्या सप्टेंबर मधील लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. या दोन्ही वर्गाची परीक्षा २५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. राज्यात दहावी, बारावीची परीक्षा ही शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येईल.
    दहावी, बारावीच्या श्रेणी व तोंडी परीक्षा ही ११ ते २१ सप्टेंबरदरम्यान होणार आहे. तर याच दरम्यान दहावीची तंत्र व पूर्व व्यावसायिक परीक्षा ११ ते १४ सप्टेंबर या कालावधीत घेतली जाईल. विज्ञान व तंत्रज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा संबंधित परीक्षा केंद्रावरच घेण्यात येईल. अंध, मुकबधिर, अपंग विद्यार्थ्यांच्या कार्यानुभव विषयांची लेखी व प्रात्यक्षिक परीक्षाही ११ सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान होईल.
    मुंबई विभागातून या दहावी, बारावीच्या परीक्षेला सुमारे दोन लाख विद्यार्थी बसणार आहेत. या परीक्षेच्या संदर्भातील सर्व माहिती शिक्षण मंडळाच्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दहावीची परीक्षा १७ ऑक्टोबर पर्यंत चालेल तर बारावीची परीक्षा ९ ऑक्टोबरला संपणार असल्याची माहिती शिक्षण मंडळाचे विभागीय प्रभारी सचिव सु. बा. गायकवाड यांनी दिली.
माहिती तंत्रज्ञानाची परीक्षा ऑनलाइन
    बारावीच्या नियमित व पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान विषयाची परीक्षा यंदाही ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा ही कनिष्ठ महाविद्यालयातील संगणकांची मर्यादा लक्षात घेता, एकाच वेळी न घेता गटागटाने घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
 
Top