उस्मानाबाद जिल्ह्यातील 17 मध्यम, 193 लघु प्रकल्पांना दमदार पावसाची प्रतीक्षा, सीना- कोळेगावमध्ये मृत पाणीसाठा
उस्मानाबाद -: जिल्ह्यात यावर्षी सरासरी 40.05 टक्के पाऊस झाला असला तरी मध्यम आणि लघु प्रकल्प क्षेत्रात अद्यापही दमदार पाऊस न झाल्याने प्रमुख धरणांत ठणठणाट आहे. मध्यम प्रकल्पात सध्या (0) शून्य टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, 194 लघु प्रकल्पांत 1.79 टक्के पाणीसाठा झाला आहे. दरम्यान, पावसाच्या टक्केवारीमध्ये औरंगाबाद विभागात उस्मानाबाद जिल्हा यावर्षीही पिछाडीवर आहे. हे प्रकल्प भरण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

यावर्षी पावसाला सुरुवात लवकर झाली असली तरी दमदार पावसाने हजेरी न लावल्याने नद्या, ओढे खळाळून वाहिले नाहीत. तसेच जिल्ह्यातील धरणेदेखील तहानलेलीच आहेत. सध्या रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडत असल्याने हे पाणी जमिनीत मुरत आहे. तसेच दमदार पाऊस होत नसल्याने प्रकल्पांतील पाणीसाठय़ामध्ये वाढ झालेली नाही. जिल्ह्यात सीना- कोळेगाव हा एकमेव मोठा प्रकल्प असून, यामध्ये सध्या 19.210 दलघमी पाणी आहे. परंतु, या प्रकल्पात उपयुक्त पाणीसाठा नाही. तसेच 17 मध्यम प्रकल्पांपैकी उस्मानाबाद शहराजवळील वाघोली मध्यम प्रकल्प (2.87) वगळता उर्वरित 16 प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा झालेला नाही. एकूण मध्यम प्रकल्पांत 0.10 टक्के पाणीसाठा झाला आहे. तर एका प्रकल्पात 25 टक्के पाणी असून, आठ प्रकल्पांतील पाणी जोत्याच्या खाली आहे. आठ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. 193 लघु प्रकल्पांपैकी 81 प्रकल्प जोत्याखाली असून, 81 प्रकल्प कोरडे पडले आहेत. सलग दोन वष्रे दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांमध्ये ठणठणाट निर्माण झालेला आहे. उस्मानाबाद शहराला पाणीपुरवठा करणार्‍या तेरणा मध्यम प्रकल्प कोरडा असून, रुईभर प्रकल्पातही उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे भविष्यकाळात टंचाईची शक्यता आहे.

211 - एकूण प्रकल्प
90 - प्रकल्प जोत्याखाली
89 - प्रकल्प कोरडे
16 - प्रकल्प 15 टक्के साठा

अशी आहे जिल्ह्यातील प्रकल्पांची स्थिती
प्रकल्प संख्या उपयुक्त साठा(दलघमी) टक्केवारी
मोठे 1 0.000 0.00
मध्यम 17 0.096 0.10
लघु 194 5.917 1.79

गतवर्षीच्या तुलनेत बर्‍यापैकी पाऊस
गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाची सुरुवात लवकर झाली. शिवाय रिमझिम पाऊस झाल्याने खरिपातील पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले होते. गतवर्षी पावसाने ताण दिल्यामुळे खरीप व रब्बी दोन्ही हंगामावर विपरित परिणाम झाला होता. यावर्षी दि. 25 जुलैपर्यंत जिल्ह्यात 40.05 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे.

यावर्षीचा पाऊस

274.2 भूम

224.6 परंडा

314.8 वाशी

266.4 कळंब

342.56 लोहारा

282.6 उमरगा

438.84 तुळजापूर

345.4 उस्मानाबाद

उस्मानाबादवर कृपादृष्टी
पावसाची उस्मानाबाद शहर व परिसरावर कृपादृष्टी दिसून येत आहे. जिल्ह्यातील महसूल मंडळातील 42 सर्कलमध्ये यावर्षी सर्वाधिक पावसाची नोंद (574 मिमी) उस्मानाबाद सर्कलमध्ये झाली आहे. तर सर्वात कमी पावसाची नोंद परंडा तालुक्यातील सोनारी सर्कलमध्ये (134.5) झाली आहे. उस्मानाबाद परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने शहरातील भोगावती नदीतून काही प्रमाणात पाणी वाहत आहे.

औरंगाबाद विभागात पिछाडी


औरंगाबाद विभागात पावसाच्या टक्केवारीत उस्मानाबाद जिल्हा यावर्षीही पिछाडीवर आहे. दि. 25 जुलैपर्यंत औरंगाबाद जिल्ह्यात 48.33 टक्के, जालना 60.78 टक्के, परभणी 59.46, हिंगोली 76.72, नांदेड 62.51, बीड 52.11, लातूर 55.13 टक्के आणि उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच 40.05 टक्के पावसाची नोंद झाली आहे. दरवर्षीच जिल्हा पिछाडीवर असतो.
 
Top