बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील तालुका विकास मंच, अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास यांच्यावतीने देशभक्ती सार्वजनिक वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले.
    यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब झालटे, पोपटवीर, बाळासाहेब जाधव, विक्रम सावळे, श्रीमंत बांगर, संतोष सावळे, हेमंत रामगुडे, शिरीष ताटे, राजू कांबळे, दाजी सावळे, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.
    याप्रसंगी बोलताना विक्रम सावळे यांनी बोलताना सांगितले, अण्णा हजारे यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित 75 कलमी कार्यक्रमातील वाचनालयाच्या माध्यमातूनही समाज जागृती करण्याचा समावेश आहे. मागील हजारो वर्षापासून सर्व सामान्यांच्या मनात असलेल्या देशभक्तीमध्ये सध्याच्या भ्रष्टाचारामध्ये अडथळे येत असून चांगल्या दर्जाचे प्रशासन व इतर देशांच्या पुढे आपल्या भारताचा विकास करण्यासाठी आजच्या युवकांनी पुढे येत आपल्या कल्पना वास्तवात उतरविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. जपानमधील फुकोशिमा येथील आलेल्या राष्ट्रीय आपत्तीवर तेथील नागरिकांनी 14 तासांत जीवाचे रान करुन प्राथमिक नियंत्रित केले. परंतु आपल्या देशात असलेल्या अनियंत्रित प्रशासनामुळे केदारनाथ प्रलयासारखे प्रसंग उदभवल्यावर परिस्थिती हाताबाहेर जाऊनही मदतकार्य पोहोचत नाही. भाषावाद, प्रांतवाद, जातीवाद यांसारख्या विषारी प्रवृत्तीला मुळापासून उपटून काढण्यासाठी आजच्या तरुणांच्या हदयात देशभक्ती वाढीस लागणे गरजेचे आहे. आपल्या वाचनालयात केवळ वृत्तपत्रेच उपलब्ध केली जाणार नसून यापुढे दुर्मिळ पुस्ताकांची उपलब्धता करुन समृध्द ग्रंथालय उभे राहील, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
    यावेळी राजा कांबळे, बाळासाहेब जाधव, सुदर्शन हांडे, मल्लिकार्जून धारुरकर, शिरीष ताटे यांनी समायोचित विचार मांडले. सूत्रसंचालन सचिन गायकवाड यांनी केले.
 
Top