लोहारा -: आजचे विद्यार्थी देशाची भावी काळातील संपत्ती आहे. त्यांच्या जडणघडणीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार तथा लोकमंगल उद्योग समूहाचे अध्यक्ष सुभाष देशमुख यांनी केले. 
     लोहारा तालुक्यातील तोरंबा येथे स्वामी विवेकानंद विचार मंचच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रंजनाताई बनसोडे तर प्रमुख उपस्थितीत उपसरपंच यादव चव्हाण, माजी उपसरपंच बळीबापू रणखांब, भारतीय जनता पक्षाचे तालुका उपाध्यक्ष प्रवीण चव्हाण, माजी सरपंच शिवाजी दुणगे, मुख्याध्यापक शाहुराज तावशे आदी मान्यवर होते.
    यावेळी पुढे बोलताना देशमुख म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या प्रकारची गुणवत्ता आहे. परंतु, त्यांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर रहावे व पालकांनीही आपल्या पाल्यांसमोर व्यसन करू नये, असे आवाहन केले. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थी अनिता दुणगे, रणधीर राजकुमार, प्राजक्ता नन्नवरे, रार्जशी भालेराव, प्रमोद तेली, दयानंद माताळे, अश्विनी दुधभाते यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विचार मंचचे अध्यक्ष विक्रम चव्हाण, उपाध्यक्ष गोविंद दुणगे, सचिव रजनीकांत बेडगे यांच्यासह लिंबराज बिराजदार, राकेश मेवाडा, अमर यादव, निलेश भालेराव, विनोद कांबळे यांनी पुढाकार घेतला.

 
Top