सातारा : मलकापूर नगर पंचायतीने मुलींसाठी राबविलेली प्रियदर्शनी कन्या रत्न योजना राज्य शासनामार्फत राज्यभर राबविण्याचा मानस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
    मलकापूर नगरपंचायत व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानांतर्गत विद्यार्थींना मोफत बस पास वाटप व बस सेवेचा शुभारंभ मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज मलकापूर येथे करण्यात आला, त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास गृहराज्यमंत्री सतेज पाटील, खासदार रजनी पाटील, आमदार जयकुमार गोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षा शारदा खिलारे, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बांगर, पोलीस अधीक्षक के.एम.एम. प्रसन्ना आदी उपस्थित होते.
    मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, मलकापूर नगरपंचायतीची 24X7 नळपाणी पुरवठा योजना देशभर लौकिकपात्र ठरली आहे. नगरपंचायतीने नागरिकांना पायाभूत नागरी सुविधा देऊन विकासाचा मोठा टप्पा गाठला आहे. शहरातील मुलींसाठी नगरपंचायतीने विविध योजना हाती घेतल्या असून जन्मलेल्या मुलींसाठी कन्या रत्न योजना प्रभावीपणे राबविली आहे. मुलींसाठी ही एक उत्तम योजना आहे.
    मलकापूर नगरपंचायतीच्या वतीने विद्यार्थींना मोफत बस पास देणाऱ्या श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या यशस्वीतेनंतर ही योजना राज्यभर राबविण्याचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
    मलकापूर नगरपंचायतीच्या सांडपाणी प्रक्रिया योजनेस तसेच नगरपंचायत क्षेत्रात 1200 आसन क्षमतेचे सभागृह उभारण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली जाईल. नगरपंचायतीने विकास कामे अत्यंत गतीने करुन मॉडेल नगरपंचायत म्हणून विकसीत करण्याबाबत घेतलेल्या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले.
    यावेळी त्यांनी नगरपंचायतीने महिला आणि मुलींसाठी राबविलेल्या विविध योजनांचेही कौतुक केले. नगरपंचायतीच्या विविध उपक्रमांना शासनस्तरावरुन सर्वते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली.
दुष्काळावर मात करण्यासाठी शासनासह लोकसहभागातून भरीव काम : मुख्यमंत्री
    राज्यात गेल्या दोन वर्षात पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीवर विविध शासन योजना आणि लोकसहभागातून भरीव काम करुन दुष्काळग्रस्तांना सहाय्यभूत होण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली आहे, असे मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी सांगितले.
    मुख्यमंत्री म्हणाले, दुष्काळग्रस्तांना सहाय्यभूत होण्यात शासन यंत्रणेबरोबरच विविध सेवाभावी, स्वयंसेवी, सहकारी संस्थांचे मोठे योगदान असून लोकांनी गंभीर दुष्काळी परिस्थितीवर संयमाने आणि जिद्दीने मात करण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे.
    दुष्काळ निवाणाच्या उपाययोजनाअंतर्गत राज्यात शासन योजना आणि लोकसहभागातून गाळ काढण्याचे मोठे काम झाले असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, तलावातील माती नालाबांध आणि तलावातील गाळ काढण्याचे काम देशात उल्लेखनीय ठरले आहे. या उपक्रमामुळे पाणीसाठ्यात वाढ होण्याबरोबरच जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होणार आहे. पुणे विभागातील सातारा, सांगली, सोलापूर, पुणे या चार जिल्ह्यात सिमेंट नालाबांध आणि पाझर तलावातील गाळ लोकसभागातून काढल्यामुळे जवळपास साडेआठ टीएमसी पाणीसाठा झाला असून ही समाधानाची बाब असल्याचेही ते म्हणाले.
    राज्यात दुष्काळी परिस्थितीमध्ये 1 हजार 300 चारा छावण्या उघडून अडीच लाख जनावरांची सोय करण्यात आली असून या छावण्यातील जनावरांच्या तपासणीबरोबरच छावणीतील लोकांचीही आरोग्य तपासणी केली जात आहे. राज्यात आज 5 हजार टँकरने 11 हजार गावातील लोकांना पाणी पुरवठा केला जात आहे. टंचाईच्या निवारणासाठी आवश्यक त्या सर्व उपायोजना करण्यास शासनाने प्राधान्य दिले असल्याचेही मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले.
    याप्रसंगी गृहराज्यमंत्री श्री. पाटील म्हणाले, मलकापूर नगरपंचायतीने नागरी विकासाचे विविध उपक्रम हाती घेऊन ते यशस्वी केले आहेत. नगरपंचायतीने गेल्या 5 वर्षात विकासाची फार मोठी क्रांती केली आहे.
    याप्रसंगी डॉ. सविता मोहिते यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मलकापूरच्या नगराध्यक्षा शारदा खिलारे यांनी स्वागत व सत्कार केला. उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी प्रास्ताविकात मलकापूर नगरपंचायतीने राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
 
Top