मुंबई :- हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कुशल प्रशासनाने ११ वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवणारे वसंतराव नाईक यांचे जीवनपट लवकरच रुपेरी पडद्यावर येणार आहे. ‘महानायक’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटाचा मुहूर्त मुंबईत नुकताच झाला. हा चित्रपट दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचा निर्माता दिग्दर्शकांचा मानस आहे.
       या चित्रपटात वसंतराव नाईक यांच्या जीवनातील महत्त्वाचा कालखंड दाखवण्यात येणार असून या चित्रपटात वसंतराव नाईक यांची भूमिका चिन्मय मांडलेकर करणार आहे. लवकरच चित्रीकरण सुरू होणार आहे. महानायक या चित्रपटासाठी तुकाराम बिडकर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. या चित्रपटाचे कलादिग्दर्शन गिरीश कोळपकर करणार आहेत. छायांकनाची जबाबदारी चंद्रकांत मेहर यांच्यावर असून मंदार खरे हे संगीत देणार आहेत.
    या चित्रपटातली वेशभूषाकाराची जबाबदारी प्रदीप पेमगिरीकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. वेशभूषा रश्मी रोडे यांची असेल. या चित्रपटाचे चित्रीकरण पुणे, मुंबई, अकोला या भागात करण्यात येणार आहे. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षात हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक नीलेश जळमकर यांनी सांगितले.
 
Top