बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: कवि कालिदास मंडळाच्यावतीने देण्यात येणा-या मेघदूत पुरस्कारासाठी गंधवेणा आणि संभमित वर्तमान या काव्यसंग्रहाची यंदाच्या मेघदूत पुरस्कारासाठी निवड झाल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुमन चंद्रशेखर यांनी दिली.
    मागील 21 वर्षापासून कवितेच्या क्षेत्रात कवि कालिदास मंडळ उल्लेखनीय कार्य करीत असून प्रत्येक वर्षी आषाढातील पहिल्या रविवारी कालिदास महोत्सव साजरा करण्यात येतो. यावर्षीचा 21 वा महोत्सव सुलाखेच्या शिशु विहार सभागृहात दि. 14 जुलै रोजी संपन्न होत आहे. मुकुंद काळे तसेच कवि प्रेमनाथ रामदासी यांना यावर्षीचा मेघदूत पुरस्कार देण्यात येत आहे. यावेळी डॉ. भारती रेवडकर यांच्या उंबरठा आणि डॉ. सुर्यकांत घुगरे यांच्या क्षितीज काव्यसंग्रहाचे कवी म्हणून विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. शब्बीर मुलाणी, मुकुंदराज कुलकर्णी, प्रकाश गव्हाणे यांनी पुरस्काराची निवड केली. डॉ. कृष्णा मस्तूद यांच्यावतीने कै. दगडू मस्तूद यांच्या स्मरणार्थ तसेच श्रीमती शारदा पानगांवकर यांच्यावतीने कै. नागनाथ पानगांवकर यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार देण्यात येत आहे.
    पहिल्या सत्रात सकाळी नऊ वाजता बाल कवि संमेलन होत आहे. याकरीता शहरातील शालेय विदयार्थंना सहभागी केले जाणार आहे. दुस-या सत्रात राज्यस्तरीय खुल्या काव्यवाचन स्पर्धा होतील. तिस-या सत्रात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणा-या व्यक्तींचा गौरव होईल.
    पुरस्कार वितरण व संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सचिव रामचंद्र इकारे, उपाध्यक्ष जयसिंग राजपूत, कोषाध्यक्ष अनंत कुलकणी्र, दत्ता गोसावी, प्रा. सविता देशमुख, शारदा पानगावकर, अनुराधा केसकर, मुकूंदराज कुलकर्णी, शब्बीर मुलाणी, प्रकाश गव्हाणे, चन्नबसवेश्वर ढवण, महारुद्र जाधव आदीजण परिश्रम घेत आहेत.
 
Top