मुंबई : राज्यातील मराठा समाजाचा इतर मागासवर्ग या प्रवर्गामध्ये समावेश करण्यासंदर्भात आढावा घेऊन शासनास योग्य त्या शिफारशी करण्यासाठी उद्योग, बंदरे आणि रोजगार व स्वयंरोजगार मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे पुणे व नागपूर येथे दि. 12 व 20 जुलै या दिवशी दौरे आयोजित करण्यात आले आहेत.

सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व इतर संबंधितांची मते समजून घेण्याच्या उद्देशाने पुणे येथे दि. 12 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता नवीन सर्किट हाऊस सभागृह या ठिकाणी तर, दि.20 जुलै दुपारी 3.30 वा.रविभवन सभागृह, नागपूर येथे शासन नियुक्त समितीचा दौरा निश्चित करण्यात आला आहे.

या विषयाच्या अनुषंगाने लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटना यांच्याबरोबर चर्चा करुन राज्यातील मराठा समाजाची लोकसंख्या आणि त्या समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक स्थान विचारात घेण्यासाठी आणि त्यांची मते जाणून घेण्यासाठी या समितीच्या दोन दिवसीय दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी सर्व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी व इतर सर्व संबंधितांनी त्यांचे वरील विषयासंदर्भात निवेदन असल्यास लेखी स्वरुपात सदर समिती समोर नमूद केलेल्या दिनांकास निश्चित स्थळी आणि वेळेत सादर करावेत, असे आवाहन या समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top