पंढरपूर :- बार्शी उपसा सिंचन योजनेतंर्गत माढा तालुक्यातील रिधोरे गावा जवळ उभारण्यात येणा-या पंपगृहाच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाची पाहणी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांनी आज गुरुवार रोजी पाहणी केली.
           यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले की, या पंपगृहाची लवकर उभारणी करण्यात यावी तसेच या बांधकामाची गुणवत्ताही जोपासली जावी. या योजनेशी संबंधीत बाबींचा आढावा प्रत्येक गुरुवारी घेण्यात येणार असून, 31 डिसेंबर पर्यंत हा पंपगृह कार्यान्वीत करावा असे निर्देश संबंधीतांना देऊन ना. सोपल पुढे म्हणाले की, या योजनेचे पाणी सुरु झाल्यानंतर हे पाणी शेतक-यांनी शेतीसाठी ठिंबक व्दारे वापरण्याला प्राधान्य द्यावे.
          भीमा-सीना जोड कालव्याव्दारे सीना नदीत सोडले जाणारे 2.59 टी.एम.सी. पाणी दोन टप्प्यात उपसा करुन आठमाही पध्दतीने हे पाणी बार्शी तालुक्यातील 12 हजार 550 हेक्टर व माढा तालुक्यातील 2 हजार 450 हेक्टर अशा एकूण पंधरा हजार हेक्टर इतक्या क्षेत्राला सिंचनासाठी हे पाणी देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत सुमारे 31 कि.मी. पर्यंतच्या पाईप लाईनचे काम पुर्ण झाले असून, उर्वरीत काम लवकरच पुर्ण करण्यात येणार असल्याची माहिती भीमा कालवा मंडळ (सोलापूर) चे अधिक्षक अभियंता त.बा.तोंडे यांनी प्रास्ताविकात दिली.
     कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नागेश अक्कलकोटे तर आभार प्रदर्शन बिराजदार यांनी केले. यावेळी उजनी कालवा विभाग क्रं.8 चे कार्यकारी अभियंता बी.एस. बिराजदार, उप-कार्यकारी अभियंता एस.एस. तिपरादी,  शाखा अभियंता एस.के होनखांबे,  राजन ठाकूर,  युवराज चुबंळकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
 
Top