परंडा : विठ्ठलाच्या चरणी लिन होण्यासाठी मस्तकी चंदन, गळा तुळशीमाळ, मुखात विठोबा-रुक्माईचा जयघोष, हातात टाळाचा गजर करत वारकरी मोठ्या उत्साहाने श्रीसंत एकनाथ महाराजांच्या पालखीचे सामिल होऊन पंढरीच्या वाटेने निघाले आहेत. परंड्यात गुरुवार दि. 11 जुलै रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पिंपरखेड चौकात आगमन झाल्यानंतर हजारो भाविकांनी मोठ्या भक्तीमय वातावरणात पालखीचे दर्शन घेतले.
    तालुक्यातील पाचपिंपळा येथील दुपारच्या विसाव्यानंतर हजारो भाविक भक्तांनी पालखीसह आगमन होताच दर्शनासाठी गर्दी केली. सर्वप्रथम पालखीचे स्वागत माजी आमदार चंदनसिंह सद्दीवाल, नगराध्यक्षा सौ. राजश्री शिंदे, नगरसेवक आदिका पालके, तहसीलदार वंदना निकुंभ, नगरसेविका सौ. वनिता ऐतवाडे, नगरसेविका सौ. मिरा कदम, नगरसेवक मुकूल देशमुख यांनी श्रीसंत एकनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत केले.
    शहरात ठिकठिकाणी चहा, बिस्कीटे, केळी, पोहे, पाण्याची व्यवस्था वारक-यांसाठी शहरातील नागरिकांनी केली होती. तसेच रात्रीचे जेवन अनेकांनी स्वत:च्या घरी करुन वारक-यांना जेवणाचे आमंत्रण दिले. ही पालखी मुकूल देशमुख यांच्या वाड्यात थांबते. तर माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वारक-यांना जेवणाची, राहण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली.

* साभार : एकमत
 
Top