उस्मानाबाद :- शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळाले तरच त्यांना उपयोग होईल. त्यामुळे बॅंकांनी कर्जासाठीचे प्रलंबित अर्ज मंजूर करुन 15 दिवसात पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट्य पूर्ण करावे, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी दिले. सहकार विभागाची यावेळी मदत घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
         येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सल्लागार समितीची बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एल. हरिदास, रिझर्व्ह बॅंकेचे प्रतिनिधी सांगवेकर, सहकार निबंधक एस.पी. बडे, समन्वयक दुपारगुडे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सी.डी. देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॅा. केशव सांगळे यांच्यासह विविध बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती.
         यावेळी श्री. पाटील यांनी बॅंकांनी केलेल्या कर्जवाटपाचा आढावा घेतला. आतापर्यंत केवळ 74 टक्केच कर्ज वितरण झाले आहे.  सर्व गरजू शेतकऱ्यांना कर्ज मिळणे आवश्यक आहे. विनाकारण बॅंकांकडून अडवणूक होण्याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत. अशा तक्रारींची गंभीर नोंद घेऊन यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेला कळविले जाईल, असे त्यांनी स्पष्टपणे सुनावले. बॅंक आणि सहकार विभागाने संयुक्तपणे प्रयत्न करुन पीक कर्ज उद्दिष्ट्यप्राप्तीसाठी प्रयत्न करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
       सांगवीकर यांनीही कोणत्याही बॅंकेने आपल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारु नये अशा स्पष्ट सूचना दिल्या.           
 
Top