बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: बार्शी उपसा सिंचन योजनेच्या कामातील गाताचीवाडी ते जामगाव (आ.) उजवा कालवा आणि जामगाव ते पुढील सायफन पध्दतीच्या अठरा कोटी रुपयांच्या कामाचा शनिवारी दि. 3 रोजी शुभारंभ होत आहे.
या कामाचा शुभारंभ पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांच्या शुभहस्ते व उजनी कालवा मंडळाचे सोलापूर विभागाचे अधिक्षक अभियंता ब.दा. तोंडे यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. ग्रामदैवत कानिफनाथ मंदिरालगत गाताचीवाडी बायपास येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कृष्णा खोरे विकास महामंडळ अंतर्गत उपसा सिंचन योजनेच्या सीना नदी रिधोरे ते गाताचीवाडी दरम्यानच्या अकरा किलोमीटर कालवा पंपगृह टप्पा एक रिधोरे (ता. माढा), पंपगृह टप्पा दोन लक्षाचीवाडी (ता. बार्शी) ही कामेही अंतीम टप्प्यात आहेत. गाताचीवाडी ते जामगाव कालवा किमी 11 ते 14 व जामगाव हददीतील कि.मी. 15 ते 16 पाईप सायफन या 18 कोटी रुपयांच्या कामाचा या कामात अंतर्भाव आहे.
बार्शी शहर व तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती असताना पालकमंत्री ना. दिलीप सोपल यांनी सदरच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबाबत महत्त्वाकांक्षी उजनी योजना राबवून बार्शी शहरातील नागरिकांचा पिण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकाली काढला. विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासाला बार्शीच्या पिण्याच्या पाण्यासाठी हटट धरुन योजनेला हिरवा कंदील मिळवला. काही कालावधीतच योजना मार्गी लावून बार्शीसह माढा तालुक्याचाही प्रश्न निकाली काढला. उजनी योजनेच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्नानंतर शेतक-यांना अत्यावश्यक असलेल्या शेतीसाठी बार्शी उपसा सिंचन योजना मार्गी लावली. प्रत्येक वेळी निधीची उपलब्धता करत मजल दरमजल करीत उपसा सिंचन योजना कार्यान्वित ठेवली आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरुपाचा असल्याने सदरच्या योजनेनंतर बार्शी तालुक्यातील शेतीला चांगले दिवस येतील. या योजनेमुळे शेतक-यांसह तालुक्यातील साखर कारखान्यांनाही सदरच्या योजनेमुळे चांगला फायदा होणार आहे.
ना. सोपल यांनी बार्शी उपसा सिंचनच्या कामाकरीता वेळोवेळी पाठपुरावा करत निधीच्या उपलब्धतेसह कामे सुरु ठेवून अंतीम टप्प्यापर्यंत आणले आहे. या कामाच्या भूमीपूजन समारंभास परिसरातील शेतकरी, विविध संस्था, संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन उजनी कालवा उप विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
