नवी दिल्ली :- पेट्रोलचे दर प्रति लिटर 2.35 रुपयांनी तर डिझेलचे दर प्रति लिटर 50 पैशांनी वाढविण्यात आले आहेत. आज शनिवार रोजी मध्यरात्रीपासून नवीन दर लागू केले जाणार आहेत. नवीन दरांमधून स्थानिक विक्री कर आणि व्हॅट वगळण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येक शहरानुसार ही दरवाढ जास्त राहणार आहे. गेल्या तीन महिन्यातील ही सहावी दरवाढ आहे.

डिझेलमध्ये प्रति लिटर 3 ते 5 रुपयांनी, रॉकेलमध्ये प्रति लिटर 2 रुपयांनी तर एलपीजी सिलिंडरमध्ये तब्बल 50 रुपयांनी वाढ करण्याचा प्रस्ताव पेट्रोलियममंत्री एम. विरप्पा मोईली यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासमोर ठेवला होता.

रुपया खाली घसरत असताना जागतिक बाजारपेठेत तेलाचे दर वाढत असल्याने पेट्रोलियम कंपन्यांना तब्बल 180,000 कोटी रुपयांचा तोटा होत आहे, असेही त्यांनी पंतप्रधानांना कळविले होते.

या प्रकरणी विरप्पा मोईली यांनी गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली. जर दरवाढ केली नाही तर केंद्र सरकारला तब्बल 95,500 कोटी रुपये सबसिडी द्यावी लागेल, असेही मोईली यांनी पंतप्रधानांना सांगितले होते.

मोईली यांनी पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात सांगितले होते, की जर सद्यस्थिती कायम राहिली तर तेल कंपन्यांना तब्बल 180,000 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागेल. गेल्या आर्थिक वर्षांत या कंपन्यांचा तोटा 161,000 कोटी रुपये होता.
 
Top