तुळजापूर -: ट्रकच्या भीषण धडकेत टमटममधील दोघे जागीच ठार झाल्याची घटना तुळजापूर- सोलापूर मार्गावर सुरतगावनजीक शनिवार दि. 31 ऑगस्ट रोजी घडली. अपघातानंतर ट्रकचालक ट्रक जागीच सोडून फरार झाला. अपघात इतका भीषण होता की, एकजण टमटम आणि झाडामध्ये अडकला होता. क्रेनच्या साहाय्याने टमटम हलवून प्रेत बाहेर काढण्यात यश आले.
    टमटमचालक बाळू मोरे, अनिल शंकर गायकवाड (दोघे रा. शिक्रापूर, ता. शिरुर जि. पुणे) हे अपघातात जागीच ठार झालेल्यांचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर, जि. पुणे) येथून घरगुती साहित्याचे भाडे घेऊन सोलापूर येथे आलेला टमटमचालक बाळू मोटे व त्याचा साथीदार देवीदर्शनासाठी निघाले असता सोलापूरकडे भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने (क्र. टीएन 28 एजे 7920) सुरतगाव शिवारात सरदार धाब्याजवळ टमटमला (क्र. एमएच 12 जेटी 7875) जोराची धडक दिली. यामध्ये टमटमचालक बाळू मोरे, साथीदार अनिल शंकर गायकवाड हे जागीच ठार झाले.
    याप्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक दिलीप जाधव करीत आहेत.
 
Top