उस्मानाबाद :- जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,उस्मानाबाद, भारतीय प्रबंधन संस्था, अहमदाबाद व स्टेट इनोवेशन ॲन्ड रिसर्च फौंन्डेशन, सोलापूरच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण दिनानिमित्त दि. 3 व 4 सप्टेंबर रोजी प्रयोगशाळा शिक्षक कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कमलादेवी आवटे यांनी दिली.अशा प्रकारे कार्यशाळा आयोजित करणारी संपूर्ण राज्यात उस्मानाबाद ही पहिली जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था ठरणार आहे.
    अध्ययन-अध्यापनप्रक्रिये दरम्यान शिक्षकांना येणाऱ्या अडचणी दुर करण्यासाठी कांही प्रयोगशील शिक्षक प्रयत्नशिल असतात, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ व्हावी, प्रभावी अध्यापन, विविध विषयाचे अध्यापन, शैक्षणिक साहित्य निर्मिती, पटनोंदणी व उपस्थिती,‍विशेष गरजा असणारी मुले, मुलींचे शिक्षण व बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंमलबजावणीसाठी केलेले शैक्षणिक प्रयोगाची दखल या उपक्रमात घेतली जाणार आहे.
    या कार्यशाळेत  शिक्षकांनी केलेल्या नाविण्यपूर्ण शैक्षणिक प्रयोगांचे सादरीकरण केले जाणार असून शैक्षणिक प्रयोगाचे संकलन करुन एज्युकेशन इनोवेशन बँक तयारी केली जाणार आहे. हे शैक्षणिक प्रयोग वेबसाईटवर उपलब्ध करुन दिले जाणार असून हा उपक्रम विनामुल्य राहणार आहे.
    डाएटचे  ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. दयानंद जटनुरे व फौंडेशनचे सिध्दराम माशाळे  हे या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.अहमदाबादचे प्रकल्प व्यवस्थापक चैतन्य भट्ट, प्रकल्प सहायक सुरेंद्र वाघमारे, बाळासाहेब वाघ, अनंत बावधनकर, सुधीर नाचणे, व्यंकटेश कुलकर्णी, महेबुब सवार तसेच राज्यातील नवोपक्रमशील पुरस्कार विजेते शिक्षक उपस्थित राहणार आहेत.
            कार्यशाळेचे संयोजन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था उस्मानाबादतर्फे करण्यात आले असून जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किशोर चौधरी यांचे सहकार्य लाभणार आहे.
 
Top