तुळजापूर -: पूर्ववैमनस्यातून तरुणांच्या दोन गटात तलवार, कोयता, गुप्ती, चाकू आणि लाठय़ा- काठय़ांनी झालेल्या भांडणात 9 जण जखमी झाल्याची घटना तुळजापूर येथे घडली. याप्रकरणी दोन्ही गटातील 26 तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी मोकाट असून, घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण होऊन काही भागातील दुकाने बंद करण्यात आली होती.रामेश्वर बाळासाहेब कदम (रा. तुळजापूर) यांना नळदुर्ग रोडवरील जिजाई ढाबा येथे मागील भांडणाची कुरापत काढून सचिन साळुंके, दुर्गेश साळुंके, चिमण्या मगर (सर्व रा. तुळजापूर) यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. याप्रकरणी रामेश्वर कदम यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच घटनेचा जाब विचारण्यासाठी विशाल छत्रे, अमित अरगडे, महेश गरड, चैतन्य शिंदे, नानू साठे, शुभम साठे, सोमनाथ स्वामी, कृष्णा गितकर, नारायण हुंडेकर, प्रशांत कांबळे, संग्राम सूर्यवंशी, नितीन आदटराव, राकेश कदम, विकास वाघमारे, विक्रम कदम, लखन परमेश्वर, भैय्या काळे, अनंत छत्रे, नागेश शेटे, अजय शिंदे, सुदर्शन नाइकवाडी (रा.सर्व. तुळजापूर) यांनी उस्मानाबाद रस्त्यावरील राजामामा भोसले यांच्या शेतातील काठेवाड धाबा येथे तलवारी, कोयता, चाकू, गुप्ती, लाठय़ा, काठय़ा घेऊन प्रितम केपडकर, रोहित पेंदे, दीपक निकम, सुहास टोले, दुर्गेश साळुंके, सूर्यकांत साळुंके, गजानन हंगरगेकर, संदिप टोले, सुहास टोले यांना मारहाण करून गंभीर जखमी केले.
याप्रकरणी सचिन साळुंके यांच्या फिर्यादीवरून वरील 22 आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक एस. पी. बुवा करीत आहेत. घटनेनंतर तत्काळ दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करून शहरात छापे मारण्यात आले. परंतु, आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले. वारंवार घडणार्या तलवार हल्लय़ाने तुळजापूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, घटनेनंतर शहरात तणाव निर्माण होऊन काही भागातील बाजारपेठ बंद करण्यात आली होती.