उस्मानाबाद -: श्री क्षेत्र कुंथलगिरीचा निसर्गरम्य परिसर, रिमझिमत्या पावसाने हिरवी शाल पांघरुन स्वागताला असलेला भोवताल अशा छानशा वातावरणात महसूल दिनाचा सोहळा साजरा झाला. दैनंदिन कामकाजातून मिळालेला स्वतासाठीचा वेळ, उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा झालेला सत्कार आणि त्यांचे पालकत्व स्वीकारलेल्या जिल्हाधिकारी डॅा. के. एम. नागरगोजे यांनी दिलेला मोलाचा सल्ला! त्याचबरोबर, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी केलेले बहुमोल मार्गदर्शन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिलेल्या शुभेच्छा.. अशा वातावरणात हा महसूल दिन सोहळा पार पडला.
        भूमच्या  तहसीलदार अहिल्या गाठाळ आणि त्यांच्या प्रत्येक सहकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अतिशय चांगले नियोजन, त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न यामुळे या कार्यक्रमाची उंची अधिकच वाढली. रविंद्र हायस्कूलच्या विद्यार्थींनींनी म्हटलेल्या स्वागतगीतानेच या कार्यक्रमाची नांदी झाली.
         जिल्हाधिकारी डॅा. नागरगोजे यांनी महसूल विभाग ही शक्ती असल्याचे सांगून सर्वांनी एकत्रितपणे चांगले काम करण्याची गरज व्यक्त केली. जल, जमीन, जंगल या सभोवतालच्या निसर्गाची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या प्रत्येकावर असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
     या कार्यक्रमात उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी म्हणून मिनाज मुल्ला, उत्कृष्ट तहसीलदार म्हणून अहिल्या गाठाळ, नायब तहसीलदार- दिनेश झांपले, एन. व्ही. जाधव, लघुटंकलेखक- एस.बी. राकडे,  तलाठी- व्ही. व्ही. काळे, टी. एच. काळे, मंडळ अधिकारी- पी. टी. जाधव, एन. के. पाटील, अव्वल कारकून- व्ही. एन. केळेकर, के.के. कुलकर्णी,  वाहनचालक- एस.एन. फंड, लिपीक- संगीता गलांडे, श्पाई- आर. एच. जाधव, बी. एन. पुंडे, कोतवाल- भानुदास पवार, ए. एम. बेंबळकर यांचा यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  याशिवाय महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचाही सत्कार करण्यात आला.
     या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी सर्वश्री सचिन बारवकर, शिल्पा करमरकर, संतोष राऊत, मिनाज मुल्ला, शोभा जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर व बी.एस. चाकूरकर यांच्यासह जिल्ह्यातील सातही तालुक्यांचे तहसीलदार, महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जीवन कुलकर्णी, तलाठी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एन. के. मंडाळे, वाहनचालक संघटनेचे अध्यक्ष राजू जमादार, शिपाई संघटनेचे अध्यक्ष पी. एन. गोरे, कोतवाल संघटनेचे अध्यक्ष मोहन अडागळे  यांचाही यावेळी श्रीमती गाठाळ आणि नायब तहसीलदार एस. के. राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांनी केले तर उपविभागीय अधिकारी शोभा ठाकूर यांनी आभार मानले.
 
Top