उस्मानाबाद -: पावसाच्या संकलन नोंदी व्यवस्थित होतात की नाही, हे तपासण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. के.एम. नागरगोजे यांनी सर्व तालुक्यांच्या तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार केलेल्या तपासणीत बहुसंख्य ठिकाणी संबंधित मंडल अधिकारीच नोंद घेत असल्याचे निष्पन्न झाले असून पर्जन्यमापक यंत्रही सुस्थितीत आढळले आहे. केवळ सोनारी (ता. परंडा) येथे पर्जन्यमापकावर नोंदी घेण्यात निष्काळजीपणा झाल्याचे आढळून आले असून तुळजापूर तालुक्यातील तीन मंडळाच्या ठिकाणी खासगी व्यक्ती नोंद करत असल्याचे या तपासणीत आढळून आले आहे. याप्रकरणी दोषींवर नियमानुसार निलंबन व शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.तसेच संबंधित उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर पर्यवेक्षण आणि संनियंत्रणाची जबाबदारी देण्यात आली आहे.
       उस्मानाबाद तालुक्यांतर्गत आठही मंडळातील पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत आढळून आली आहेत. केवळ सुयोग्य शासकीय जागा उपलब्ध होऊ शकली नसल्याच्या आणि पर्जन्यमापकाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून 4 ठिकाणी खासगी व्यक्तींच्या जागेत ही यंत्रे बसविण्यात आली आहेत. मात्र, या ठिकाणच्या नोंदी मंडळ अधिकारीच घेत असल्याचे तपासणीवेळी  निष्पन्न झाले आहे.
       उमरगा तालुक्यातील उमरगा, मुरुम, नारंगवाडी, मुळज आणि दाळिंब या पाचही मंडळातील पर्जन्यमापक सुस्थितीत असून ते शासकीय जागेत असल्याचे व दैनंदिन नोंदी व्यवस्थित होत असल्याचे आढळून आले आहे.
     लोहारा तालुक्यातील लोहारा, माकणी आणि जेवळी या तीनही ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत असल्याचे व नोंदी व्यवस्थितपणे होत असल्याचे निदर्शनास आले आहे. वाशी तालुक्यातही तीनही मंडळाच्या पर्जन्यमापकावरील नोंदी दैनंदिनपणे व सुयोग्य पद्धतीने होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
      परंडा तालुक्यातील सोनारी वगळता उर्वरित 4 ठिकाणी (परंडा, जवळा नि., अनाळा, आसू) या मंडळात पावसाच्या नोंदी व्यवस्थित असल्याचे आढळून आले.  सोनारी येथे पर्जन्यमापक यंत्राद्वारे नोंदी घेण्यात निष्काळजीपणा केल्याचे तसेच पर्जन्यमापकाची स्वच्छता न करणे, नियमाप्रमाणे पर्जन्यमापक यंत्र न लावणे असा प्रकार आढळून आला आहे. संबंधित मंडळ अधिकाऱ्यास निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
     तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर, इटकळ, नळदुर्ग, जळकोट या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत आढळून आले आहेत. उर्वरित मंगळूर, सलगरा (दि), आणि सावरगाव या ठिकाणी खासगी व्यक्तीमार्फत नोंदी धेतल्या जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, मंडळ अधिकाऱ्यांकडून या नोंदींचे प्रमाणीकरण होत असल्याचे व त्या योग्य असल्याचेही तपासणीवेळी आढळून आले. मात्र, खासगी व्यक्तींचा सहभाग घेतल्याप्रकरणी संबंधितांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार आहे.
         भूम तालुक्यातही माणकेश्वर, भूम, ईट, आंभी, वालवड या 5 ठिकाणी पर्जन्यमापकाद्वारे योग्य नोंदी होत असल्याचे आढळून आले आहे.फक्त्माणकेश्वर येथे उर्दु शाळेत हे यंत्र बसविल्याचे आढळून आले आहे.
         कळंब तालुक्यातही सहा पर्जन्यमापक यंत्रे सुस्थितीत असल्याचे आढळून आले असून योग्य पद्धतीने नोंदी असल्याचे आढळून आले आहे
 
Top