उस्मानाबाद -: जिल्ह्यातील चालू खरीप हंगामात पीक कर्ज वाटप करतांना बँकांनी शेतकऱ्यांच्या प्रलंबित कर्ज प्रकरणांवर सामंजस्याची भूमिका घेऊन कर्जाचे वाटप करावे, असे निर्देश उपस्थित बँकेच्या प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांनी दिले.
    येथील जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. नागरगोजे यांनी  आज विविध बँक प्रतिनिधी व सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून कर्ज वितरणाबाबत तालुकानिहाय आढावा घेवून त्यांना दिलेले उदिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश दिले. शेतकरी पीक कर्जाचे नुतनीकरण करण्यासाठी बँकेकडे येत नाहीत त्यासाठी तालुक्यातील सहायक निबंधक कार्यालयाच्या सहकार्याने जास्तीत जास्त शेतकऱ्याकडून नुतनीकरण करावे. शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन खरीप हंगामातच  त्यांना  पीककर्ज देण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्यांचे नवीन पीककर्जाचे अर्ज घेत नसल्याबाबत तक्रारीवर निराकरण करतांना ते म्हणाले की, सर्व बँकानी नवीन कर्ज प्रकरणांचे अर्ज स्विकारावेत. नवीन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांनाही खरीप हंगामात पीककर्जाचे वाटप करुन दिलेले उदिष्ट  बँकांनी पूर्ण करावे. शाखानिहाय बँकानी कर्जाची प्रकरणे हाताळतांना शेतकऱ्यांना चांगली वागणूक द्यावी, अशा सूचनाही  त्यांनी बँक प्रतिनिधींना दिल्या.
       यावेळी अप्पर जिल्हाधिकारी राम मिराशे, सहकार विभागाचे प्र. जिल्हा उपनिबंधक यु. यु. पवार, बँकांचे जिल्हा समन्वय अधिकारी तसेच  संबंधित अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.
 
Top