मुंबई : बुद्धीस्ट सर्कीटपैकी पाच महत्वाची जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे महाराष्ट्रात असून नुकतेच जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सीच्या मदतीने अजिंठा-वेरुळ येथे जागतिक दर्जाचे पर्यटक केंद्र उभारण्यात आले आहे. जपानमधील पर्यटकांना ही स्थळे नक्कीच आकर्षित करतील, असा विश्वास राज्याचे पर्यटन मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.
    पर्यटनवृद्धीसाठी महाराष्ट्र शासन आणि जपानमधील वाकायामा राज्य या दोहोंमध्ये ऑक्टोबर महिन्यात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जपान सरकारच्या निमंत्रणावरून भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नुकताच जपानचा दौरा केला. त्यावेळी झालेल्या एका संयुक्त बैठकीत भुजबळ बोलत होते.
    यावेळी पर्यटन मंत्री भुजबळ यांनी सांगितले की, महाराष्ट्रात लेणी, गड-किल्ले, निसर्गरम्य समुद्र किनारे यासारखी जागतिक दर्जाची अमर्याद अशी पर्यटनस्थळे आहेत. देशामध्ये सर्वाधिक परदेशी पर्यटकांनी भेट दिलेले राज्य म्हणून महाराष्ट्राचा नुकताच गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्र आणि वाकायामा-जपान यांच्यात पर्यटनवृद्धीसाठी संयुक्त प्रयत्न करण्यात आल्यास त्याचा दोन्ही राज्यांना निश्चितच फायदा होईल.
     शिरीहामा शहराचे महापौर इटानी यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी झालेल्या एका संयुक्त बैठकीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे राज्यातील पर्यटनस्थळांबाबत समग्र माहिती देणारे सादरीकरण करण्यात आले.
    या दौऱ्यात भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जपानमधील होकैडो बेटावरील पाण्याखालील सागरी निरीक्षणालय आणि कुचिमोटसो मत्स्यालय, नाची फॉल, कोयासन येथील ऐतिहासिक प्राचीन स्थळांना व धार्मिकस्थळांना भेट दिली.
        या भेटी दरम्यान, वाकायामा येथे पर्यटन विषयक संयुक्त बैठक घेण्यात आली. भार‍तीयांना जपानबद्दल आदर असून ब्रिटिशांच्या तावडीतून भारताला मुक्त करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेल्या प्रयत्नांना जपानने केलेल्या सहाय्याचा उल्लेख श्री.भुजबळ यांनी वाकायामाचे राज्यपाल श्री.निसाका यांच्याशी बोलतांना केला. दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे ‘हिरोशीमा दिन’ पाळण्यात येतो, असेही श्री.भुजबळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी पर्यटनमंत्र्यांनी श्री.निसाका यांना महाराष्ट्र भेटीचे निमंत्रण दिले. त्यानुसार दोन्ही राज्यांमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यात पर्यटनवृद्धीसाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे.
    शिष्टमंडळात राज्याचे पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सुमित मलीक व राज्य पर्यटन विकास महामंडळातील अन्य अधिकाऱ्यांचा समावेश होता.
 
Top