उस्मानाबाद -: जिल्ह्यातील चार तालुक्यांतील नऊ गावांना निर्मलग्राम पुरस्कार जाहीर झाला आहे. औरंगाबाद येथे सोमवारी दि. 26  ऑगस्ट रोजी होणा-या कार्यक्रमात राज्यपाल के. शंकर नारायणन यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
    जिल्ह्यात 2011 मध्ये अनेक गावांत निर्मलग्राम अभियान राबविण्यात आले. याच्या माध्यमातून स्वच्छतागृहांची निर्मिती, कचरा व्यवस्थापन, गावातील स्वच्छता, शाळा व अंगणवाडी स्वच्छता आदी बाबी राबविण्यात आल्या. या गावांची पाहणी करण्यात आली. शासनाने ठरविलेले निकष पूर्ण करणार्‍या गावांची शिफारस निर्मलग्राम पुरस्कारासाठी करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ स्तरावरून विविध पथकांनी गावांना भेटी दिल्या. यापैकी वाखरवाडी (ता. उस्मानाबाद), अलियाबाद, अमृतवाडी, तीर्थ (बु.) ता. तुळजापूर), गणेशनगर (ता. उमरगा) लोहारा (बु.), तावशीगड, कोंडजीगड, कानेगाव (ता. लोहारा) या गावांची निर्मलग्राम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या गावातील ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना राज्यपाल नारायणन् यांच्या हस्ते सोमवारी औरंगाबाद येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभागृहात पुरस्कारांचे वितरण होणार आहे. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री अँड. दिलीप सोपल, राज्यमंत्री रणजित कांबळे, सतेज पाटील आदींची उपस्थिती राहणार आहे. जिल्ह्यातून सरपंच, ग्रामसेवक यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सुभाष व्हट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एल. हरिदास, जिल्हा समन्वयक डॉ. शितलकुमार मुकणे उपस्थित राहणार आहेत.
 
Top