मुंबई -: भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी पात्र उमेदवारांना एसएसबी  प्रशिक्षण वर्ग ठेवण्यात आला असून सदरच्या प्रशिक्षण वर्गासाठी सैन्य दलातील तज्‍ज्ञ अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षण मिळणार आहे. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी  11 सप्टेंबर, 2013 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई शहर  येथे उपस्थित राहावे असे आवाहन मुंबई शहर सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
           कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या व स्पेशल एंट्र द्वारे सैन्यदलात अधिकारी होऊ इच्छिणाऱ्या तसेच ज्या महाराष्ट्रीयन नवयुवक/युवतींना सशस्त्र सैन्यदलाकडून एस.एस.बी. परिक्षेची मुलाखत पत्रे मिळण्याची शाश्वती आहे, अशा उमेदवारांसाठीSSB मुलाखतीच्या पूर्व तयारीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, विभागीय महसूल आयुक्त कार्यालय परिसर, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येणार आहे. प्रशिक्षण कोर्सचा कालावधी 17  ते 26 सप्टेंबर, 2013 (एकूण 10 दिवस) असा आहे. प्रशिक्षण कालावधीत निवासाची व प्रशिक्षणाची सोय विनामूल्य करण्यात आलेली असून भोजनासाठी प्रती दिवस रु. 54 /- प्रमाणे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येईल.
    खालील प्रमाणे पात्रता धारण करीत असतील अशाच उमेदवारांनी प्रशिक्षण वर्गात प्रवेश घेण्यासाठी  11 सप्टेंबर, 2013 रोजी सकाळी 10 वा. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय मुंबई शहर  येथे शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मूळ प्रतींसह मुलाखतीस हजर रहावे.
    एस.एस.बी. प्रवेश वर्गासाठीची खालील प्रमाणे कोणतीही एक पात्रता आवश्यक आहे :- एसएसबी मुलाखतीचे पत्र (प्राप्त झाले असल्यास) किंवा सीडीएस लेखी परिक्षेत उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा स्पेशल एंट्रीद्वारे एसएसबी करिता अर्ज पाठवल्याबाबतचा पुरावा आणावा ; एनसीसी (सी) सर्टिफिकेट ए/बी ग्रेडधारक (उमेदवाराने एनसीसी ग्रुप हेडक्वार्टरने शिफारस केल्याचे प्रमाणपत्र बरोबर आणावे; एनडीए मधील परिक्षा उत्तीर्ण असल्याचा पुरावा आणावा; सैन्यदलामध्ये अधिकारी पदासाठी रोजगार समाचार पत्रानुसार टेक्नीकल/मेडीकल किंवा इतर अधिकारी पदासाठी अर्ज केले असल्यास अर्जाची छायांकित प्रत सोबत आणावी.
    अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 0253-2451031 वर संपर्क साधावा, असे मुंबई शहर सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.
 
Top