लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांकडून जोरदार मोर्चा बांधणीला सुरुवात झाली आहे.
    महाराष्ट्राची कुलस्वामिनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणास्थान असलेल्या श्री तुळजाभवानी मातेमुळे उस्मानाबाद जिल्हयांचे सर्वत्र ओळख आहे. या विशेषणामुळे उस्मानाबाद जिल्हयाची लोकसभेची निवडणुक इतर पक्षाकरीता अत्यंत महत्त्वाची मानली गेली आहे. कै. खा. व्यंकटराव काका नळदुर्गकर पासून ते डॉ. खा. पदमसिंह पाटील यांच्या पर्यंतच्या निवडणुका हया रंगतदार स्वरुपाच्या झाल्या आहेत.
     निवडणुकीसाठी अवघे काही महिने असले तरी त्याचे बिगुल राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार लोकसभेसाठी जाहीर करणार असल्याचे सूतोवाच दिल्यामुळे सर्वत्र पक्ष राजकीय मोर्चे बांधणीच्या कामाला लागले आहेत. उस्मानाबाद हा मतदार संघ सध्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. उस्मानाबाद लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे ठेवण्यासाठी पक्षातर्फे कार्याध्यक्ष आ. जितेंद्र आव्हाड, उमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्यक्ष उस्मानाबादला येऊन कार्यकर्त्यांना सतर्क केले आहे.
     उस्मानाबाद मतदार संघावर भाजपसेनेचा गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत निसटता पराभव झाला होता. यावेळी सेना भाजपातर्फे आपला उमेदवार निवडून येण्यासाठी जोरदार तयारी दर्शविली आहे. लोकसभेसाठी माजी आ. रविंद्र गायकवाड पुन्हा एकदा निवडणुक लढण्याची तयार दर्शविली आहे. त्यासाठी त्यांनी बार्शीचे माजी आ. राजेंद्र राऊत यांच्याशी सलगी साधली असल्याची चर्चा चालू आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव करायचा या उमेदीने भाजपाने कंबर कसली असून गेल्या सहा महिन्यापासून वरिष्ठ नेते मंडळी जिल्हयातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधत आहेत. विरोधी पक्षनेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांनी भेटी दिल्या आहेत. पंधरा दिवसापूर्वी भाजपा युवा प्रदेशाध्यक्ष आ. पंकजा मुंडे पालवे यांच्या नेतृत्वाखाली युवकांसाठी “एल्गार” मेळावा घेऊन भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे.
     काँग्रेसनेही उस्मानाबाद लोकसभा आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न चालविले आहे.  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन पाटील यांनी उस्मानाबाद जिल्हयाचा दौरा केले असून पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी तालुकास्तरीय कार्यकर्त्यांच्या बैठका घेत आहेत.
     या निवडणुकीत तुल्यबळ उमेदवारांचा अभाव असलेल्या मनसे या निवडणुकीत उतरेल का? याविषयी साशंकता आहे. मायवतींचा बसपा, प्रकाश आंबेडकरांचा रिपाइं (आंबेडकर गट) या निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतील का?  याविषयी अदयापही अनिश्चित आहे.
   खा. राजू शेटटींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपाशी हातमिळवणी करेल का? प्रत्यक्ष निवडणुक फडात उतरेल का? याविषयी या पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली नाही.
    लोकसभा निवडणुकीविषयी सध्या चर्चा होत आहेत. जिल्हयाच्या, तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळया पक्षाकडून बैठका, मेळावा होत असून जेष्ठ कार्यकर्त्यांपासून ते युवकांपर्यंत प्रत्येक पक्ष विशेष लक्ष ठेवत आहेत.
     या निवडणुकीत खा. पदमसिंह पाटील यांना पुन्हा एकदा राष्ट्रवादींकडून उमेदवारीची संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. तर त्यांना आपण केलेल्या विकास कामाची पावती मतदारांना दयावी लागणार आहे. पाच वर्षात विकासाची कोणती कामे केली? किती निधी खर्च केला? याविषयाचा पाडा खा. पदमसिंह पाटील यांना मतदारापुढे वाचावा लागणार आहे. यावरच त्याचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
       शिवसेनेला यावेळी निवडणुक जिंकण्याची चांगली संधी आहे. पण त्यांच्यापुढे तुल्यबळ उमेदवारांचा अभाव आहे. जिल्हयात जिल्हाध्यक्ष रविंद्र गायकवाड हेच एकमेव मातब्बर नेते आहेत. असा जिल्हयातील शिवसैनिकांचे मत आहे, हे आगामी काळातच कळेल.
       या निवडणुकीसाठी काँग्रेसतर्फे कॅबिनेट मंत्री ना. मधुकरराव चव्हाण, सि.ना. आलुरे गुरुजी, आ. बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील तर राष्ट्रवादीकडून खा. पदमसिंह पाटील, आ. राणाजगजितसिंह पाटील, शिवसेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष रविंद्र गायकवाड, आ. ओमराजे निंबाळकर, आ. ज्ञानेश्वर चौगुले, भाजपातर्फे ॲड. मिलींद पाटील, संघटनमंत्री प्रवीण घुगे आदीजण निवडणुकीच्या पूर्व तयारीला लागल्याची चर्चा सर्वत्र रंगत आहे.

विकास पांढरे
इटकळ
 
Top