नवी दिल्ली -: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या प्रथम स्मृतीदिनी महाराष्ट्रातीलसर्वपक्षीय खासदार, आमदार, माजी मंत्री, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र सदनाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्रध्दांजली वाहिली.
      यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी काही वेळ मौन पाळून व विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. खासदार रजनीताई पाटील यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र सदनात या श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांमध्ये खासदार रजनीताई पाटील यांच्यासह संजय राऊत, एकनाथराव गायकवाड, भास्करराव खतगावकर, भालचंद्र मुणगेकर, हुसेन दलवाई, दत्ता मेघे यांच्यासह सत्यजित गायकवाड, जोगेंद्र कवाडे, राज पुरोहीत, अतुल शहा,श्रीमती अलका देसाईयांचा समावेश होता. यावेळी या मान्यवरांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विलासराव देशमुख यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकला.    
        महाराष्ट्राचे प्रधान सचिव तथा महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मल्लीक, सहायक निवासी आयुक्त प्रदीप कुमार, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक तथा खासदार समन्वय कक्षाचे प्रभारी प्रवीण टाके यांनीही यावेळी विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहिली. विलासराव देशमुख यांच्या सोबत विविध स्तरावर कार्य करणार्‍या महाराष्ट्र सदनातील कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनीही यावेळी विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुर्ष्पाण करुन श्रध्दांजली वाहिली.  
 
Top