पुणे -: सध्या फेसबुक आणि तत्सम सोशल साईटमुळे तरुण पिढी बिघडत आहे, असे आरोप सतत होतात. मात्र याच फेसबुकमुळे आईला हरवलेला आपला मुलगा सापडल्याची घटना पुण्यात घडली. फेसबुकमुळे भंडारी कुटुंबाला दहा वर्षापूर्वी हरवलेला मुलगा सापडला आणि त्या आईच्या आनंदाला पारावार उरला नाही. मायलेकाच्या या भेटीची हकीकतही अगदी चित्रपटाच्या कथेला शोभेल अशीच आहे.
    आईने रागावल्यामुळे अंकुश भंडारी 2002 साली घरातून निघून गेला. एका ट्रकमध्ये आश्रय घेतल्याने तो ट्रकसोबत नांदेडला पोहोचला. नांदेडमधील गुरुद्वारामध्ये त्याने सेवा करायला सुरुवात केली. त्याची सेवा पाहून शिखांच्या एका धर्मगुरुनी त्याला पंजाबमधील लुधियानात नेले. त्याच्या सान्निध्यात राहून अंकुशने शीख धर्म स्वीकारला. अंकुशवरुन त्याचे गुरबान सिंग असे नामकरण करण्यात आले. तेथील गुरुद्वारातही त्याने मनोभावे सेवा केली. मात्र आपल्या घरातील आठवणी तो विसरु शकला नव्हता. एकदा फेसबुक चाळत असतना तो संतोष भंडारी नावाच्या प्रोफाईजवळ स्तब्ध झाला. प्रोफाईलचा तपशील वाचल्यानंतर तो आपलाच भाऊ असल्याची खात्री पटली आणि एका क्षणाचाही विलंब न करता त्याने भावाला फोन केला. भावाकडून दुजोरा मिळाल्यानंतर त्याने खात्री पटवण्यासाठी आईला फोन दिला. तुला कुठे जखमी झाली आहे का? असे आईने विचारले. आपल्या डोक्याला जखम झाली होती, असे एका क्षणातच त्याने आईला सांगितले. एवढेच नाही, आपल्या मुलाच्या चालण्याची पध्दतही त्या आईने पटवून घेतली. आपला हरवलेला हाच तो मुलगा, अशी खात्री पटल्यावर त्या आईचा आनंदाश्रूंचा बांध फुटला.
 
Top