बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : रोजचा संवाद हे वृक्तृत्व आहे व याला देण्यात येणारी शास्त्रीय बैठक हे भाषण हाये. आपण बोललेले समाजाच्या अंत:करणाला भिडले पाहिजे. भाषणात जग जिंकण्याची ताकद असल्याचे मत विवेक घळसासी यांनी व्यक्त केले.
    शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ व सार्धशती समारोह समितीच्या संयुक्त विदयमाने आयोजित संत तुकाराम सभागृह येथे झालेल्या एक दिवसीय वक्ता प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी सोलापूर येथील डॉ. संजय देशपांडे, एम.एस. देशपांडे, डॉ.बी.वाय. यादव, डॉ. मधुकर फरतोडे, डॉ. रजनी जोशी, डॉ. राजेंद्र दास आदी उपस्थित होते.
    पुढे बोलताना घळसासी म्हणाले, स्वामी विवेकानंद हे वक्ता म्हणून श्रेष्ठ होते. चार तत्त्वामध्ये बळकट शरीर आणि मेंदू एकाग्रता, विषयावरची निष्ठा व भाषण, कृतीतील एकरुपता असल्यास भाषण प्रभावी होते. दीडशे वर्षानंतरही स्वामी विवेकानंदांचे विचार सुसंगत वाटतात. जाती म्हणजे समाजाला पोखरुन टाकणारा कॅन्सर होय. श्रम आणि त्याग या दोन तत्त्वांची समाजाला गरज आहे. आज नटण्यापेक्षा पेटण्याची गरज आहे. स्वत:च्या सर्व क्षमतांचा विश्वाच्या विकासासाठी उपयोग केल्यास खरे अध्यात्मिक होता येईल. आज राष्ट्रीय नैराश्य दूर करण्याची गरज निर्माण झाली आहे. जगातील सर्व धर्मांची तत्वज्ञाने स्वामी विवेकानंदांच्या जीवनात आहेत, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
    याप्रसंगी चंद्रकांत मोरे, ज्योती डोळस, आतिश सुरवसे, बी.वाय. यादव यानी समयोचित विचार मांडले. सूत्रसचांलन डॉ. राजेंद्र दास तर आभार डॉ. वत्सला पवार यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यशाळेची समाप्ती करण्यात आली.
 
Top