उस्मानाबाद :- रेशीम शेती उत्कृष्टरित्या करुन रेशीम कोषाचे चांगल्या प्रकारे करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार प्रादेशिक रेशीम विकास विभागाचे प्रादेशिक सहायक संचालक दिलीप हाके यांच्या हस्ते करण्यात आला.
          येथील रेशीम विकास कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, तालुका कृषी अधिकारी एस. पी. जाधव, रेशीम विकास अधिकारी पी. एस.गणाचार्य यांच्यासह रेशीम उद्योजक शेतकरी उपस्थित होते.
         रेशीम शेती उत्कृष्टरित्या करुन रेशीम कोषाचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी  तुती प्लॅट मधील फिलींग,चॉकी  रेअरींग, रेशीम कीटकांची प्रौढ अवस्था, किटक संगोपन आदिंबाबत श्री. हाके यांनी मार्गदर्शन  केले. यावेळी तेरखेडा (ता.वाशी) येथील दीपक पौळ आणि चिंचोली भू. (ता. उमरगा) येथील बळवंत गोविंद गायकवाड या रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा प्रत्येकी रुपये एक हजार देऊन सत्कार करण्यात आला.
          तोटावार यांनी यावेळी रेशीम शेतकऱ्यांनी क्लस्टरमध्ये तुतीलागवड वाढवावी  व गट स्थापन करुन कृषी विभागाच्या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले. कृषी खात्याकडून शेततळी, पॉवर ट्रेलर, पॉवर व्हीलर असे साहित्य रेशीम उत्पादकांना देण्याबाबत प्राधान्य देण्यात येईल, असे सांगितले. रेशीम शेती कमी पर्जन्यमान असलेल्या उस्मानाबाद जिल्हयासाठी अतिशय उत्कृष्ट उद्योग असून हा उद्योग गावपातळीवर वाढला पाहिजे, असे नमूद केले.
          या चर्चासत्रात रेशीम उद्योजक शेतकरी पोपट गुंड, जयश्चंद्र गुंड, शिरीन पाटील, सुधाकर जाधवर, शिवाजी नाईकनवरे, दिपक पौळ, बळवंत गायकवाड, जयहिंद धुरगुडे, अशोक निपाणीकर, आबासाहेब पाटील, बाबू तुळजापूरे, दयानंद कडके आदि रेशीम उत्पादन शेतकऱ्यांनी रेशीम उत्पादनामध्ये येणाऱ्या अडीअडचणी विषद केल्या.
         आपल्या प्रास्ताविकात रेशीम विकास अधिकारी, श्रीमती गणाचार्य यांनी रेशीम उत्पादनाबाबत केलेल्या कार्यवाहीची माहिती  दिली. सूत्रसंचलन इप्पर एस.इ. यांनी केले.
 
Top