नवी दिल्ली :- साठेबाज आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे शुक्रवारी सराफा बाजारात सोने आणि चांदीची तेजी उतरली. दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ६२५ रुपयांनी कमी झाला आणि ३१,७०० पर्यंत खाली आला. तर चांदीच्या भावातही प्रति किलोला १,७१० रुपयांची घट झाली. मुंबईतही सोन्याच्या भावात प्रति तोळा तब्बल १७४५ रुपयांची घट झाली आणि भाव ३१,५२० पर्यंत खाली आला. शेअर बाजारातील तेजीने गुंतवणूकदार सोने विक्री करून नफा कमावत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
      जागतिक बाजारातही सोन्याचे भाव घसरले. अमेरिकन अर्थव्यवस्थेची अपेक्षेपेक्षाही सकारात्मक आकडेवारी येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे फेडरल रिझव्‍‌र्हकडून रोखे खरेदी कमी केली जाईल, या आशेने आंतरराष्ट्रीय कमोडिटी मार्केटमध्ये सोन्याची विक्री झाली. देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्यावर दबाव आहे.
गेल्या आठवडयापासून तेजीमध्ये असलेल्या सोन्याने ३४,५०० रुपयांचा उच्चांक गाठला होता. मात्र या तेजीचा फायदा घेत साठेबाज विक्री करून नफा कमावत असल्याने सोन्याच्या भावात सलग दुस-या दिवशी घसरण झाली असल्याचे कमोडिटी तज्ज्ञांनी सांगितले.

सोने आयात महागली

सोन्याचे भाव उच्चांकी स्तरावर असताना सरकारने शुक्रवारी सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंवरील आयात शुल्क वाढवले आहे. या वाढीनंतर सोने आणि चांदीवरील हे शुल्क अनुक्रमे ४६१ डॉलर प्रति तोळा आणि ८०३ डॉलर प्रति किलोवर गेले आहे. याआधी हे शुल्क सोन्यावर ४३२ डॉलर प्रति तोळा आणि ६९७ डॉलर प्रति किलो एवढे होते. केंद्रीय उत्पादन आणि सीमा शुल्क मंडळाच्या या अधिसूचनेनंतर सोने आयातीवरील खर्च वाढणार आहे.
 
Top