सोलापूर -: उजनी धरणातील पाणी जिल्ह्यातील किती तलावात सोडता येवू शकते, याचा विचार करुन विविध तलावात पाणी साठविण्यासाठी निश्चित कार्यक्रम हाती घेवून भूगर्भातील पाणी पातळीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केंद्रीय कृषीमंत्री शरदराव पवार यांनी केले.
    उजनी धरणास भेट देवून जलपूजन केल्यानंतर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ) मंत्री शशिकांत शिंदे, सोलापूरचे पालकमंत्री दिलीपराव सोपल, माजी उपमुख्यमंत्री आ. विजयसिंह मोहिते-पाटील, माजीमंत्री आ. लक्ष्मणराव ढोबळे, आ. गणपतराव देशमुख, आ. बबनदादा शिंदे, आ. भारत भालके, आ. दिलीपराव साळुंके-पाटील, आ. श्रीमती श्यामल बागल, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशिगंधा माळी, माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार सर्वश्री सुधाकरपंत परिचारक, नरसिंग मेंगजी, विनायकराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    यावेळी बोलतांना कृषीमंत्री शरदराव पवार म्हणाले की, उजनी धरणाच्या पाण्याद्वारे किती तलाव भरता येतील याचे नियोजन करुन तलाव भरण्याचा कार्यक्रम घ्यावा. मागील वर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विविध तलावातील गाळ काढण्यात आला आहे. या सर्व तलावांमध्ये पाणी भरता आले तर भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होवून खरा फायदा होईल असे प्रतिपादन केले.
    जिल्ह्यातील तलावांची यादी जलसंपदा विभागाकडे पाठवावी. याबाबत किती तलावात पाणी सोडता येईल, याबाबत सर्वेक्षण करुन आवश्यक कार्यवाही करता येईल. तसेच यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आवश्यक तरतूद ठेवावी अशा सूचना जलसंपदा (कृष्णा खोरे पाटबंधारे महामंडळ) मंत्री शशिकांत शिंदे यांनी दिल्या.
    उजनी धरणातील पाणी डाव्या व उजव्या कालव्याद्वारे तसेच बोगद्याद्वारे सोडण्यात येत असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. तसेच नीरा उजवा कालवा जूना झाला आहे. याच्या दुरुस्तीसाठी खर्च करणे आवश्यक असल्याची मागणी यावेळी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी केली. याबाबत केंद्राच्या वतीने काय मदत करता येईल याबाबतचा सविस्तर प्रस्ताव द्यावा. त्याप्रमाणे त्याचा विचार केला जाईल असे श्री. पवार यांनी सांगितले.
    तसेच केंद्र शासनाच्या ए.आय.बी.पी. योजनासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वाटपाप्रमाणे निधी व तांत्रिक अडचणी मांडण्यात आल्या. याबाबत केंद्राकडे राज्य शासनामार्फत प्रस्ताव पाठवावा त्याचा ही विचार करण्यात येईल असे श्री. पवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे टेंभु प्रकल्पाबाबतची सद्यस्थिती यावेळी पवार यांनी जाणून घेवून सांगोल्यापर्यंत पाणी लवकर येण्यासाठी या कामास गती देण्याची सूचना देवून सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली. यावेळी नीरा व भीमा नदीवर बॅरेजस् उभारण्याबाबत चर्चा झाली.
    यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी विविध समस्या मांडल्या त्याप्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश  पवार यांनी संबंधितांना दिले.
     प्रारंभी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत उजनी धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आले.
    सुरवातीस जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस, खरीपाच्या तालुकानिहाय, पिकनिहाय झालेली पेरणी, विविध प्रकल्पातील पाणीसाठा, टंचाईमध्ये घेतलेल्या विविध उपाययोजनाची माहिती दिली. तसेच जिल्ह्यातील विविध प्रकल्पातील व तलावातील सुमारे 125 लाख क्युबिक मीटर गाळ काढला असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे जिल्ह्यात टँकरची संख्या 672 पर्यंत गेली होती ती सध्या 292 पर्यंत आली आहे. यामध्ये मंगळवेढा, सांगोला, माढा, करमाळा तालुक्यात टँकर सुरु आहेत. जिल्ह्यात सध्या मंगळवेढा, सांगोला, पंढरपूर या तालुक्यात 97 चारा छावण्या सुरु असल्याचे सांगितले.
    या बैठकीला कृष्णा खोरे महामंडळाचे कार्यकारी संचालक सि. मा. उपासे, मुख्य अभियंता सी. ए. बिराजदार, अविनाश सुर्वे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम कासार, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, अप्पर जिल्हाधिकारी अशोक काकडे, अधिक्षक अभियंता श्री. अजय दाभाडे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष संजय मामा शिंदे, मनोहर डोंगरे, यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 
Top