उस्मानाबाद : सोलापूर-हैद्राबाद महामार्ग चौपदरीकरणासाठी भूसंपादनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. के. एम. नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.  या बैठकीस उमरग्याचे आमदार ज्ञानराज चौगुले, माजी आमदार रविंद्र गायकवाड, नगर पालिकेचे अध्यक्ष रज्जाक अत्तार, उमरग्याचे उपविभागीय अधिकारी व्यंकटराव कोळी, उस्मानाबादचे उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सोलापूर विभागाचे प्रबंधक आर. एस. जिरगे, प्रकल्प संचालक बी. बी. इखे, जिल्हा सरकारी वकील विजयकुमार शिंदे, भूसंपादन अधिकारी बी. एस. चाकुरकर व के. ए. तडवी, जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी. एम. थोरात व उमरगा तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
    याप्रसंगी  आ. चौगुले व माजी आ. गायकवाड यांनी राष्ट्रीय महामार्गाकरीता उमरगा तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन केल्या आहेत त्यांच्या अडचणी प्रशासनासमोर मांडल्या.  भूसंपादन केलेल्या जमिनीचा मावेजा देताना योग्य असणारा दर देण्यात यावा तसेच  यापूर्वी हा महामार्ग 60 फुट होता त्यात 40 फुट वाढ करण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांच्या जमिनी 17 फुट संपादन केल्या आहेत त्यांची नावे 7/ 12 वरुन कमी करुन मावेजा मिळावा अशी मागणीही या बैठकीत केली.
जिल्हाधिकारी डॉ.  नागरगोजे यांनी त्या अडचणी जाणून  घेवून कोणत्याही शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही व त्यांना योग्य तो मोबदला देण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच  त्यांच्या अडचणी सोडविण्यास शासन सदैव तत्पर असल्याचे सांगितले.  तसेच मावेजा देताना अडचणी उदभवू नये म्हणून सबंधित शेतकऱ्यांनी वारसदारांच्या योग्य त्या नोंदी केल्या जातील याची काळजी घ्यावी व संबंधिताकडून तशी कार्यवाही करुन घ्यावी असे सांगितले.
    यावेळी महादेव कोराळे, बाबुराव ‍शिंदे, मोहनराव कुलकर्णी, प्रा. वडदरे यांच्यासह उमरगा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 
Top