अक्कलकोट -:  कुरनूर मध्यम प्रकल्पात 100 टक्के जलसाठा झाला आहे. रविवारी प्रकल्पात 822 एमसीएफटी पाणीसाठा झाला. त्यामुळे 150 क्युसेक्स पाणी प्रकल्पातून बोरी नदीपात्रात सोडले जात आहे. प्रकल्प भरल्याने परिसरातील शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
    बोरी व हरणा नदीतून 200 क्युसेक्स प्रवाह प्रकल्पात येत असल्याची माहिती लघुपाटबंधारे खात्याचे साहाय्यक अभियंता ए. आर. जाधव यांनी दिली. तुळजापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे हे पाणी येत आहे. प्रकल्प पूर्ण भरल्याने रविवारी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते प्रकल्पस्थळी जलपूजन करण्यात आले. यावेळी मातोर्शी कारखान्याचे संचालक भगवान शिंदे, सरपंच अमर पाटील, विलास गव्हाणे, भीमाशंकर कापसे, देविदास जाधव, अविनाश बावकर, सरपंच प्रकाश दुपारगुडे, पांडुरंग चव्हाण, र्शीशैल दुधगी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिलीप काजळे यांनी केले. सिद्धाराम भंडारकवठे यांनी आभार मानले.
    उजनी धरणातील एकरुख उपसा सिंचन योजनेद्वारे कुरनूर प्रकल्पात आणण्यासाठी 38 कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी सुधारित मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही योजना मार्गी लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी या वेळी बोलताना दिली.
 
Top