सोलापूर :- सहकार क्षेत्राच्या गुणात्मकवाढीसाठी 97 वी घटना दुरुस्ती रोल मॉडेल ठरेल असे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.
     सोलापूर येथील वि.गु. शिवदारे मंगल कार्यालयात झालेल्या सहकारी संस्थांच्या सहकार मेळाव्यात सहकार मंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पाणीपुरवठा व स्वच्छता तथा पालकमंत्री दिलीप सोपल, जि.प. अध्यक्षा डॉ. निशीगंधा माळी, महापौर अलका राठोड, सर्वश्री आमदार गणपतराव देशमुख, सिद्रामप्पा पाटील, भारत भालके, दिलीप माने आदी मान्यवर उपस्थित होते.
     सहकार मेळाव्यात मार्गदर्शन करताना सहकार मंत्री पाटील म्हणाले की, आतापर्यंत सहकारक्षेत्र कायद्याने चालत होते परंतू आता घटनेने चालणार आहे. सहकारातील घटना दुरुस्तीमुळे अधिक पारदर्शीपणा येणार आहे. सहकार क्षेत्रात संख्यात्मकदृष्टया वाढ झाली असली तरी गुणात्मकवाढीसाठी 97 वी घटना दुरुस्ती रोल मॉडेल ठरेल. भविष्यातील सहकाराची दिशा उज्‍ज्वल होण्यासाठी या घटना दुरुस्तीतील कलमांचा अभ्यास होणे गरजेचे  आहे. सहकार ही ख-या अर्थाने लोकचळवळ बनावी याकरीता ही घटना दुरुस्ती महत्वाची ठरली आहे. म्हणून या घटना दुरुस्तीबाबत असणारे संभ्रम दुर करण्यासाठी असे सहकार मेळावे संपूर्ण राज्यभर आयोजित केले जाणार असल्याचेही सहकार मंत्री म्हणाले.
     या घटना दुरुस्तीतील कलमांप्रमाणे सहकारी क्षेत्रातील निवडणुका आता राज्य निवडणुक आयोगाद्वारे घेतल्या जातील. तसेच संचालक मंडळाची मर्यादा केवळ 21 संचालक इतकीच ठेवण्यात येईल. क्रियाशील सभासदालाच मतदानाचा अधिकार प्राप्त होईल. वार्षिक सर्वसाधारण सभेस कोणत्याही प्रकारची मुदतवाढ मिळणार नसून 30 सप्टेंबर पूर्वी सर्व कामकाजाची रुपरेषा ठरवावीच लागेल. इतकेच नव्हेतर सहकार क्षेत्रातील बँका, डेअरी, सहकारी सेवा सोसायट्या यांच्यासह सर्वच विभागांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करण्यात आली आहे. संचाल‍क मंडळासह सर्वच सदस्यांना प्रशिक्षण अनिवार्य करण्यात आले असून लोकांमध्ये जागृती होण्यासाठी याचा चांगला वापर होईल. सहकारी साखर कारखाने लिलावात काढले जाणार नाहीत याबाबत कायदा करण्यात येत आहे  असेही ते म्हणाले.
ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषीवर अवलंबून असून आजपर्यंत जिल्ह्यात 90 टक्के  पिकविमा कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. 1 लाखापर्यंत 0 टक्के तर 3 लाखापर्यंत 3 टक्के व्याजदराने कर्ज देणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य असून सहकाराचा वारसा पुढे चालविण्यात सोलापूर जिल्ह्याने मोठे योगदान दिल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले.
     पालकमंत्री दिलीप सोपल म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात सहकाराची बिजे रोवली गेली होती स्वातंत्र्योत्तर काळात यशवंतराव, वसंतराव इ. सह अनेकांनी सहकार क्षेत्र मजबुत करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. महाराष्ट्रातील ग्रामीण माणसांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी सहकारी बँकांचा महत्वाचा वाटा आहे. आज 90 टक्के पतसंस्था चांगले काम करीत असून धोके टाळण्यासाठी, व्याजाच्या मागे पळण्याची सामान्यांची प्रवृत्ती बदलली पाहिजे. आज स्पर्धेचे युग असून सहकार क्षेत्रामध्ये  काम करताना जागतिकीकरणामुळे आलेल्या संकटांना न घाबरता तोंड द्यावे. संस्थांचा कारभार करताना चोखपणे करावा. या क्षेत्रात संख्यात्मक वाढ झाली असून गुणात्मकवाढीची आणि कुशल संचालक व कर्मचा-यांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार गणपतराव देशमुख, दिलीप माने, माजी आमदार सुधाकरपंत परिचारक आणि प्रशांत परिचारक यांचीही समयोचित भाषणे झाली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा उपनिबंधक बी.टी. लावंड यांनी सहकार मेळावा आयोजनामागची भूमिका विशद केली. या मेळाव्यास माजी मंत्री आनंदराव देवकते, माजी आमदार निर्मला ठोकळ, नरसय्या आडम, सुधाकर परिचारक यांच्यासह सहकार क्षेत्रातील मान्यवर, संचालक आणि नागरीक उपस्थित होते.
 
Top