नळदुर्ग -: गेल्या आठवडयापासून तुळजापूर तालुक्यासह सर्वत्र जोरदार पावसाचे आगमन झाले असून दि. 19 सप्टेंबर अखेरपर्यंत जवळपास 700 मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. लवकरच नळदुर्ग येथील बोरी धरण भरण्याच्या मार्गावर असून हे धरण भरल्यास ऐतिहासिक किल्ल्यातील ''नर-मादी'' हा धबधबा सुरु होण्याची शक्यता नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इतिहासप्रेमी नागरिक व पर्यटकांतून नर-मादी धबधबा वाहण्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे.
नळदुर्ग येथील कुरनुर (बोरी धरण) मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने बोरी धरण भरण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे धरण भरुन जास्त झालेले पाणी सांडव्यातून वाहून जाण्याची शक्यता आहे. हा धरण भरण्यास केवळ दोन फुट पाणी कमी असल्याचे नळदुर्ग नगरपालिकेचे पाणीपुरवठा अधिकारी डी.एन. कस्तुरे यांनी 'तुळजापूर लाईव्ह' शी बोलताना सांगितले. नळदुर्गच्या उत्तर दिशेला असलेल्या बोरी धरणातील जास्त झालेले पाणी वैशिष्ट्यरित्या नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात वळविण्यात आले आहे. त्यामुळे किल्ल्यातील प्रेक्षणीय स्थळ असलेल्या ''नर-मादी'' हा धबधबा वाहण्याची अपेक्षा वाढल्या आहेत. असाच पाऊस सुरु राहिल्यास येत्या काही दिवसात नर-मादी धबधबा सुरु होईल.