
महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती, राष्ट्र सेवा दल व समविचारी संस्था, संघटनेच्यावतीने नळदुर्ग येथील आलियाबादच्या ‘‘आपलं घर’’ प्रकल्प येथे आयोजित निर्धार मेळावा संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरुन ज्येष्ठ विचारवंत पन्नालाल सुराणा हे बोलत होते. यावेळी माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी, राज्य प्रधान सचिव महेश मोटे, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा.ए.ओ. पाटील (धुळे), आपलं घर प्रकल्पाचे अध्यक्ष माधव गुरव, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. किरण सगर, प्रा. शरद गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पन्नालाल सुराणा बोलताना पुढे म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी घेतलेल्या विवेकवादी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वारसा पुढे सुरु ठेवण्याची गरज आहे. समाजातील वाईट प्रथा, जादूटोणा, भुत प्रेत, बुवाबाजी, साधू आदीसह समाजातील अन्य विषयांवर अंधश्रध्देचे निर्मूलन करावे, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
याप्रसंगी सि.ना. आलुरे गुरुजी म्हणाले की, मराठवाडयातील चिवरी (ता. तुळजापूर) या गावी महालक्ष्मी देवीच्या यात्रेत पशुहत्येवरुन जो संघर्ष निर्माण झाला होता, तो संघर्ष दाभोळकरांसारख्या कार्यकर्त्यांच्या प्रेरणेतूनच निभावून नेता आले. दाभोळकरांचे कार्य हे त्यांच्या हत्येमुळे पुसून न जाणारे आहे. दाभोळकरांनी सुरु ठेवलेली साधना महाराष्ट्रातील चळवळीचे सर्व तरुण कार्यकर्ते यापुढेही सातत्याने चालवतील. माझ्यासारखे अनेकजण साधना वाचक मंडळासाठी मदत करतील, या आश्वासनासह मी स्वतः अनिसचे काम करण्याचा निर्धार या मेळाव्यातून व्यक्त करत असल्याचे त्यांनी सांगितले.
या निर्धार मेळाव्यास उस्मानाबाद जिल्हयातील 141 समविचारी संस्था, संघटनांचे पाचशेहून अधिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या मनोगतातून अनिसाची चळवळ निर्भयपणे चालविण्याचा निर्धार या मेळाव्यात केला.
यावेळी अनिसचे माजी जिल्हा कार्याध्यक्ष अॅड. देविदास वडगावकर, कॉम्रेडचे अरुण रेणके, जिल्हाध्यक्ष शैलजा भस्मे, छात्र भारतीचे बालाजी तांबे, रचनात्मक संघर्ष समितीचे मुकेश सोनकांबळे, जयश्री बिराजदार, अँड. राज कुलकर्णी, परिवर्तन सामाजिक संस्थेचे मारुती बनसोडे, हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे डॉ. शशिकांत अहंकारी, नागबोधी रिचर्स सेंटर उस्मानाबादचे सुदेश माळाळे, लोक भारती संस्थेच्या पुष्पा क्षिरसागर, लोक प्रबोधन संस्थेचे अजय धोतरकर, कॅप्टन जोशीचे निजगुण स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आपलं घर येथील संतोष बुरंगे, अण्णा सनदी, जावेद नदाफ, वसंत घोडके, संगीत विभागप्रमुख श्रीराम पोतदार, खंडु मुळे, पार्वती बिराजदार, मंगल शिरसे, धनश्री बिराजदार, शांता माने, निर्मला जगदाळे, ज्योती घोडके, सरिता बनसोडे, सविता औचार, विजया बिवलकर, मुख्याध्यापक सुरेश कांबळे, अनिल धामशेट्टी यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री वाघमारे (उस्मानाबाद) यांनी तर आभार आपलं घर प्रकल्पाचे व्यवस्थापक शिवाजी पोतदार यांनी मानले.