18 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन
झाले आणि भारतीय स्वातंत्र्याला ख-या अर्थाने पूर्णत्व आले.
मराठवाड्यांच्या वीरांनी हौतात्म्य पत्करून निझाम राजवटीचे तख्त उखडून
टाकले. तो लढा संपूर्ण मराठवाडावासी कसे विसरू शकतील, दि. १७ सप्टेंबर रोजी
मराठवाडा मुक्तीचा ६५ वा वर्धापन दिन आज असून अंगावर शाहरे आणणा-या या
इतिहासाला उजाळा देण्याकरिता आजही मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहाने
संपूर्ण मराठवाड्यात साजरा केला जातो.
तुळजापूर
तालुक्यातील हिप्परगा येथील माळरानावर व्यंकटराव देशमुख व अनंतराव काका या
बंधूनी विश्वनाथ रामचंद्र होनाळकर, आनंदराव आप्पाराव पाटील यांच्या
सहकार्याने इ.स. १९२१ साली विजयादशमीच्या मुहुर्तावर राष्ट्रीय शाळेची
स्थापना केली. या शाळेचे नाव प्रायव्हेट स्कूल होते. पहिले मुख्याध्यापक
म्हणून एस.के. केसकर (फलटण), तर शिक्षक म्हणून रामचंद्र गोविंद परांजपे
(बाबासाहेब परांजपे), पटवर्धन (मुंबई), एस.के. कुलकर्णी (सातारा),
श्रीपादराव कुलकर्णी तसेच ह.रा. महाजनी आदीसह इतरांनी हिप्परग्याच्या
राष्ट्रीय शाळेत तरूण पिढी घडविण्याचे काम केले आहे. या शाळेचे विश्वस्त
मंडळात पुढील ध्येयवादी व्यक्ती होते. अध्यक्ष भास्कररावजी वकील, नळदुर्ग
व्यवस्थापक अनंतराव काका, सहव्यवस्थापक विश्वनाथराव तावशीकर, रामरावजी वकील
उमरगा, व्यंकटरावजी वकील (हिप्परगा), देविदासराव नाईक (तुळजापूर), हिशोब
तपासीस विश्वासनाथराव होनाळकर (हिप्परगा), व्यंकटराव खेडगीकर उर्फ स्वामी
रामानंद तीर्थ (मुख्याध्यापक), कोडोपंत कानडे इत्यादी या शाळेतून हैद्राबाद
स्वातंत्र्य संग्रामाचे रणशिंग फुंकले.
या
काळात मीर उस्मान अलिखॉं बहादूर हा शेवटचा निझाम होता. लातूर येथील कासिम
रझवी हा निझाम स्टेटमध्ये वकील करीत होता. हा सामान्य बुद्धीचा अविवेकी व
धर्म वेडा होता. त्याने रझाकार व इत्तेहादुल्ला मुस्लिम संघटनेमार्फत
हैद्राबाद संस्थानात १९४६ ते १९४८ पर्यंत सर्वसामान्यांवर अत्याचार जुलूम,
बलात्कार, नंगानाच करून हैदोस घातल्याचा उल्लेख आढळतो.
इ.स.
१९३८ साली स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली पहिला सत्याग्रह
झाला. स्वामींजीच्या प्रेरणेने सत्याग्रही आंदोलनाचे लोण संस्थानातील
खेडोपाडी जावून पोहचले. स्टेट कॉंग्रेस इतकीच आर्य समाजाची देखील चळवळ
व्यापक स्वरूपाची होती. कॉंग्रेसचा सत्याग्रह यात सिटीग्रुप
विद्यार्थ्यांचे वंदे मातरम् व आर्य समाजाची ज्वलंत संघटना या सर्वांमुळे
हैद्राबाद स्वातंत्र्य संग्रामाला गती आहे. सरहद्दीवर मोक्याच्या जागी
शिबीर कँम्स उघडण्यात आले. यावेळी स्वातंत्र्य भारतातील जनतेकडून आवश्यक ती
मदत मिळू लागली.
दि. २३
फेब्रुवारी १९३७ रोजी उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे भाई बन्सीलालजी येणार
म्हणून त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली. यावेळी घोषणाबाजी
होवून गावांत वातावरण तणावपूर्ण बनले. बन्सीलालजींना आणण्यासाठी उमरगा येथे
सकाळीच वेद प्रकाश आर्य उमरग्याला गेला. मात्र ते आले नाहीत म्हणून वेद
प्रकाश उशिरा घरी परतला. त्याला गावातील तणावपूर्ण परिस्थिती माहिती
नव्हती. त्याच्या घराबाहेर ‘जो बोले सो अभय वैद्यीय धर्म की जय’ अशी घोषणा
झाली. त्याला वाटले बन्सीलालजी आले म्हणून घराबाहेर पडला, मात्र समोर
इत्तेहादुल्ल संघटनेला मोठा जमाव होता. त्यांनी वेद प्रकाश आर्य यांचा
निर्घृण खून केला. त्याचे पहिले बलिदान झाले.
उस्मानाबाद
जिल्ह्यातील नळदुर्ग (तत्कालीन जि. धाराशिव) पासून जवळच असलेल्या मौजे
दिंडेगावच्या यात्रेकरिता उमरगा तालुक्यातील आष्टा गावामधून २५ ते ३०
बैलगाड्या नळदुर्ग मार्गे निघाल्या होत्या. यावेळी सर्वांत पुढे नरसिंग
साळू गायकवाड यांची बैलगाडी होती. या गाडीच्या पात्याला उंच काठीवर तिरंगा
झेंडा फडकत होता. ही बैलगाडी नळदुर्गजवळ आली असता निजाम राजवटीतील काही
रझाकार करोडगिरी नाक्यावर बसलेले होते. त्याने तिरंगा ध्यज काढावे, यासाठी
गाड्या अडविल्या, यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. मात्र ध्वज
काढण्यासाठी रझाकार पुढे आल्याने नरसिंग गायकवाडने लटकवलेली तलवार बाहेर
काढली. तिरंगा ध्वजास हात लावाल तर खतम करीन, असे सांगितल्याने रझाकार मागे
सरकले. यासर्व गाड्या दिंडेगावला पोहचून यात्रा करून परतीच्या प्रवासाला
परत त्याच मार्गाने निघाल्या, यावेळी आष्ट्याच्या गाड्यापाठोपाठ तुगांव,
मुरूम, कदेर या गावच्या ६० ते ७० बैलगाड्या एकत्र आल्या. त्याने करोडगिरी
नाक्याजवळ ‘भारत माता की जय’ अशी घोषणा दिल्याने किल्ल्याच्या भोवती व
नळदुर्गमध्ये आवाज घुमला. याच गाड्याची वाट दोन अडीचशे रझाकार पाहत बसले
होते. एका रझाकाराने बैलगाडीवरील ध्वज काढण्याकरिता गाडीवर चढला, एवढ्यात
कृष्णा माने याने त्याच्या कानपटीवर जोरदार लाठी मारली. त्यात तो रझाकार
जागीच ठार झाला. याचवेळी एका रझाकाराने पळत सुटलेल्या बैलगाडीच्या आडवे
येवून बैलाच्या जबड्यात जांबियाचा वार केला. दुसर्या एकाने शिवराम ढोपे
यांच्यावर वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर तो खाली कोसळून बेशुद्ध
झाला. त्यानंतर आलियाबादचा जहागिरदार बाबुराव पाटील यांनी आस्थेवाईकणे
चौकशी करून त्यांना धीर दिले. त्यानंतर आष्ट्यातील बळवंतराव पाटील,
दत्तात्रय भिमराव चौधरी, वीर संगप्पा आळंगे यांना निजामी पोलिसांनी वरील
घटनेत हात असल्याच्या आरोपावरून अटक केली.
या
घटनेची माहिती नळदुर्गमधील बाबुराव गोपाळराव बोरगांवकर (वकिल) यांना
मिळाली. त्यांनी गंभीर जखमी शिवराम ढोपरे यांच्यावर औषधोपचार करून त्याला
पुढील उचचाराकरिता उस्मानाबादला पाठविण्याची व्यवस्था केली. बाबुराव
बोरगावकरांनी नळदुर्गमध्ये एक सहकारी पतसंस्था स्थापन केली होती. ते
रझाकारांना रूचत नव्हते. त्यात रझाकारापासून शिवराम ढोपरेस सहाय्य केल्याने
त्यांच्यावर रझाकार चिडले. बाबुराव बोरगांवकर हे निजाम राजवटीच्या
नळदुर्गमधील किल्ल्यात मुन्सफ कोर्टात काम करत होते. रझाकारांनी बोरगांवकर
हे स्टेट कॉंग्रेसमध्ये असल्याने व व्यंकटराव वकिल हे हिंदू महासभामध्ये
असल्याने या दोन नेत्यांची हत्या करून सूड घेण्याचा कट रचला. दि. २२
फेब्रुवारी १९४७ रोजी किल्ल्यातील अदालत कचेरीतून बाबुराव बोरगांवकर,
निलय्या विरय्या स्वामी व व्यंकटराव काका बाहेर पडले. किल्ल्याच्या
प्रवेशद्वाराबाहेर आल्यानंतर एके ठिकाणी रझाकार कुजबूज करीत होते. त्यांना
व्यंकटराव काकांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूकडे पहात अमीन कचेरी मागूून
निसटले. तर बाबुराव बोरगांवकर व निलय्या स्वामी येत असल्याचे पाहून लपलेला
रझाकारांचा मोठा जमाव अचानक समोर येवून त्यांच्यावर जांभियाचे सपासप वार
केले. ही घटना समजताच नळदुर्ग मधील प्रतिष्ठित नागरीकांनी तात्काळ
घटनास्थळी धावून आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाबुराव बोरगांवकर व
निलय्या स्वामी यांना बाजारपेठेत आणले. त्यांनी बोलण्यापूर्वीच आपले प्राण
सोडले.
दि. १५ नोव्हेंबर
१९४७ रोजी ‘इमरोज’ या नावाच्या दैनिकाचे पत्रकार शोईब उल्लाखॉं याने
स्वखर्चाने व लोकवर्गणीच्या बळावर प्रसिद्ध केले. त्याने सरंजामशाही निजाम
राजवट आणि कासिम रजवीच्या अत्याचाराविरूद्ध आग पाखडणारे अग्रलेख दररोज
प्रसिद्ध करू लागले. त्यामुळे हैद्राबाद संस्थानात एकच खळबळ उडाली. दिनकी
सरकार और रातकी सरकार असा निजामाच्या ढोंगी राजकारणावर आणि कासिम रजवीच्या
अत्याचारावर प्रकाश टाकणारा जळजळीत अग्रलेख लिहिल्याने त्याला धमकी येवू
लागल्या. त्यातच दि. २१ ऑगस्ट १९४८ रोजी रात्री आपले काम आटोपून
कार्यालयातून बाहेर पडलेल्या पत्रकार शोईब उल्लाखॉं यांच्यावर रझाकारांनी
गोळी झाडून व त्याचे हात कलम करून त्यास मारले.
तुळजापूर
तालुक्यातील आपसिंगा या गावी देखील रझाकारानी मोठा धुमाकूळ घातल्याने
श्रीधर वर्तक व श्रीनिवासराव खोत यांच्या तुकडीने गौडगांव, ढेकरी मार्गे
डोंगराच्या आश्रयाने रोहिल्याच्या छावणीवर हल्ला करण्यासाठी रात्री दोन
वाजता आपसिंगा जवळ आले त्याने एक मैल सरपटत येवून रोहिल्याच्या छावणीवर
फायरिंग केली. यात काही रझाकार ठार झाले. तेवढ्यात दर्गावरून लपलेल्या
रझाकारांच्या मोठ्या जमावाने जोरदार गोळीबार केले. त्यात श्रीधर वर्तक याला
हुतात्म्य आले. रझाकारांने त्याचा मृतदेह दिला नाही. उस्मानाबादहून आलेले
पोलिस डी.वाय.एस.पी. ने श्रीधर वर्तकचा मृतदेह त्यांनी जीपला बांधून
उस्मानाबाद पर्यंत फरफटत नेवून विटंबना केली.
भिक्षा
मागण्याच्या निमित्ताने गौडगांव, आगळगांव, कॅम्पवर जावून माहिती पुरविता
म्हणून रेवणसिद्ध स्वामी, विरप्पा निलय्या स्वामी, बाबुराव संबुआप्पा तेली,
प्रभाकर यशवंतराव कुलकर्णी यांना वरील घटनेच्या दुसर्या दिवशी
आपसिंग्यामध्ये जिवे मारले.
नळदुर्गपासून
जवळच असलेल्या नंदगांव (ता. तुळजापूर) या गावाला दि. २२ मे १९४८ रोजी
रझाकारांनी लुटून संपूर्ण गाव जाळून बेचिराख केले. रझाकारांशी लढताना
वकारप्पा कट्टे, शिवलिंग कट्टे, गोविंद काटे, शरणाप्पा कलशेट्टी, लक्ष्मण
कामशेट्टी, मल्लिकार्जून वाले, शरणाप्पा वाले, सोमाबाई धनगर, भिमराव कोळी,
धानप्पा माशाळकर, शिवरूद्रय्या स्वामी, बसलिंग स्वामी आदी १२ लोकांना
हुतात्म्य आले.
इतिहास
जिवंत करणारा नळदुर्गमधील ‘आलियाबाद’ या नावाने ओळखला जाणारा पूल
मुंबई-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर गेल्या आठ दशकापूर्वीपासून आजही
इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा आहे. हा पूल आलियाबाद या नावाने सर्वत्र
प्रसिद्ध आहे.
नळदुर्ग
येथील बोरी नदीवर १९३० साली आलियाबाद पूल बांधण्यात आला. म्हणजे निजाम
राजवटीत झालेले हे बांधकाम आहे. यासंबंधीची माहिती एका संगमरवरावर कोरलेली
होती. पण दोन दशकांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात तो संगमरवर दगड ढासळला. या
आलियाबाद पुलाचे बांधकाम नवाब जंग यांच्या देखरेखीखाली तेजा नावाच्या
ठेकेदाराने हा पूल बांधला आहे. पोलिस कारवाईच्यावेळी हा पूल उडवून
देण्याच्या प्रयत्न चालला होता. कारण हैद्राबादला पोहचण्यासाठी भारतीय
लष्कर याच मार्गाने जाणार होते. ब्रिटिश लेप्टनंट टी.टी. मूर यांच्याकडे
पूल उडविण्याची जबाबदारी शेवटचा निजाम मीर उस्मान अली खॉं याने सोपविली
होती. त्याच टी.टी. मुर ला भारतीय लष्करांनी ताब्यात घेतले आणि पूल
सुरक्षित राहिला. आजही हा पूल भक्कम आहे. त्याला सात कमानी आहेत. इतिहासाची
साथ देत तो पूल आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. हा पूल अरूंद असून त्याच्या
शेजारीच महाराष्ट्रशासनाने काही वर्षांपूर्वी नव्याने मोठे पूल बांधले
असून त्यावरूनच सध्या रहदारी सुरू आहे.
दि.
१२ सप्टेंबर १९४८ साली भारतीय फौजदार अक्कलकोट संस्थानात दाखल झाले.
त्यांना नागप्पा बसवंतप्पा पटणे (जळकोट) यांनी जळकोट येथील रझाकारांच्या
केंद्राची माहिती दिली. दि. १३ सप्टेंबर १९४८ रोजी भारताची फौज हैद्राबाद
संस्थानात घुसली.
दि. १४ ते
१७ सप्टेंबर १९४८ पर्यंत निजामाने शरणागतीचा पांढरा ध्वज लावला. दि. १८
तारखेस हैद्राबाद संस्था भारतामध्ये विलिनीकरणाच्या कागदोपत्रावर सह्या
केल्या. हैद्राबादच्या चारमिनारवरचा असफशाही झेंडा खाली उतरविला गेला. त्या
ठिकाणी भारताचा तिरंगा ध्वज चढविण्यात आला. यानंतर कासिम रजवीला अटक
करण्यात आली. भारताचा पोलादी पुरूष सरदार वल्लभाई पटेल यांनी हैद्राबाद
संस्थानचा प्रश्न पोलीस कारवाईने सोडविला. हैद्राबाद मुक्ती संग्राम
याबाबत अनेक ग्रंथ, पुस्तके मान्यवर साहित्यिकांचे प्रसद्धि केलेले आहेत.
मराठवाडा मुक्त करण्याकरिता ज्या विरांनी आपल्या प्राणांची आहुती देवून
बलिदान दिले.
शिवाजी नाईक
संपादक
शिवाजी नाईक
संपादक