हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा हा एक अतिशय निश्चयाने व निग्रहाने लढवला गेलेला संग्राम आहे. या लढय़ातील नेत्यांचा इतिहास कधीच विसरू शकत नाही. या मुक्तिसंग्रामात धारातीर्थी पडलेल्यांमध्ये पत्रकारही मागे नव्हते. रयत, इमरोज या दैनिकांमधील अग्रलेखांनी निजामशाहीचे तख्त डगमगले, अशी माहिती ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक पंडितराव मुळजकर यांनी दिली.
    1948 पूर्वी हैदराबाद संस्थानात स्वखुशीने कार्य करणार्‍या सशस्त्र रझाकार संघटनेची स्थापना झाली. ही संघटना अत्यंत जुलमी होती. 1948 ला या सशस्त्र रझाकारांची संख्या दोन लाखांवर होती. लातूरचा वकील काशिम रझवी हा या संघटनेचा संस्थापक होता. त्याने संपूर्ण संस्थानात निरपराध जनतेची लूट करण्याचा सपाटा चालवला. त्यावेळी आम्ही रझाकाराच्या तसेच निजामाच्या जुलमी राजवटीविरोधात आवाज उठवला. यामध्ये पत्रकारही पाठीमागे नव्हते. हैदराबाद येथून संपादक एम. नरसिंगराव हे रयत या दैनिकाच्या माध्यमातून रझाकाराच्या जुलमी राजवटीच्या विरोधात लिखाण करत होते. शोएब खान हा नरसिंगराव यांचा शिष्य होता. तो रयतमध्ये उपसंपादक म्हणून काम पाहात होता. त्याने अनेक तत्ववेत्यांचे ग्रंथ वाचले असल्याने त्याचा सामाजिक व राजकीय विषयावरील अभ्यास चांगला होता. त्यातच तो नरसिंगरावांच्या लोकशाही, स्वातंत्र्य या विचाराने प्रभावित झालेला 28 वर्षांचा तरुण होता. सरमजामशाही विरोधात लिहिताना शोएबची लेखणी धारदार तलवारीसारखी चालत असे. या लिखाणामुळे रयत दैनिकावर निजामाने बंदी घातली. यामुळे शोएब दुखी झाला. त्याला पुढे बी. रामकिशनरावांनी आर्शय दिला. त्यांच्या हैदराबाद येथील वाड्यात निजाम संस्थानातील सरमजामशाही गाढून लोकशाही प्रणित नवीन राज्य प्रस्थापित करण्याच्या विचारातून शोएबने मोठय़ा धाडसाने इमरोज नावाचे दैनिक काढले. याचा पहिला अंक 15 नोव्हेंबर 1947 रोजी प्रकाशित झाला. स्वखर्च व लोकवर्गणीतून चालणार्‍या या दैनिकाचा अल्पावधीतच प्रचंड खप वाढला. निजामी राजवट आणि काशिम रझवीच्या अत्याचाराविरुद्ध आग ओकणारे अग्रलेख दैनिक इमरोजमधून प्रसिद्ध होऊ लागले. या अग्रलेखाने हैदराबाद शहर व संपूर्ण संस्थानात खळबळ माजू लागली. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांच्या अग्रलेखांनी ब्रिटिशांचे सिंहासन हादरवले. तसेच इमरोजमधील अग्रलेखाने निजामशाहीचे तख्त डगमगू लागले. याचदरम्यान शोएबने 'दिन की सरकार और रात की सरकार' असा निजामाच्या ढोंगी राजकारणावर आणि रझवीच्या अत्याचारावर प्रकाश टाकणारा जळजळीत लेख लिहिला. यामुळे रझवीचे माथे भडकले. त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. गांधीजींच्या मृत्यूची वार्ता ऐकून शोएब यांनी रात्र रडून काढली होती. यावेळी आईला त्यांनी बापूजीने शानदार मौत पाई, असे म्हटले होते. शोएबच्या मृत्यूदिवशी त्याचेच हे शब्द आईस आठवले. यावेळी त्यांनी मेरे बेटेने भी आज शानदार मौत पाई, असे गौरवोद्गार काढले.
        शोएब यांच्यावर गोळ्या झाडल्या
या लेखामुळे निजामी सत्तेविरुद्ध जनमत तयार होण्याचे उदंड कार्य सुरू झाले. ही बाब निजामी सत्तेस सलू लागली. शोएब यांना धमकीचे पत्र येऊ लागले. दैनिक बंद न केल्यास हद्दपार करण्याच्या, जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. परंतु, या धमक्यांपुढे शोएब यांची लेखणी डगमगली नाही. 21 ऑगस्ट 1948 ची ती रात्र. मध्यरात्री 1 वाजता शोएब दैनिकाचे काम आटोपून कार्यालयातून आपला मेव्हुणा महमंद इस्माईल खान याच्याबरोबर घरी परतत होते. याचवेळी पाच ते सहा रझाकारांची टोळी पाठीमागून आली. यापैकी एकाने समोर येऊन शोईबच्या हातावर वार केला. तर दुसर्‍याच क्षणी पाठीमागून रझाकारांनी गोळ्या झाडल्या.
 
शब्दांकन : प्रवीण पवार
 
Top