नळदुर्ग -: महिलानी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय प्रशिक्षण घेवून छोटे-मोठे सुरु करुन आपली आर्थिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करावा, उदयोग धंदयासाठी धाडसाने पुढे येणा-या महिलाना शासनाची जी काही मदत असले ती मदत मिळवून देण्यास आपण कटीबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा उस्मानाबाद जिल्हयाचे पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांनी नळदुर्ग येथे आयोजित महिला व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी केले.
    केंद्रशासन पुरस्कृत सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना नगरपरिषद नळदुर्ग अंतर्गत शहर दारिद्रय निर्मूलन कक्ष नगरपरिषद व सामाजिक विकास संस्था अंतर्गत असलेल्या दारिद्रयरेषेखालील महिला बचतगटाकरीता अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था पुणेच्यावतीने व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या व्यवसाय मार्गदर्शन प्रशिक्षणाचा शुभारंभ पालकमंत्री ना. मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते आपल्या उदघाटनपर भाषणात बोलत होते. पुढे बोलताना ना. चव्हाण म्हणाले की, महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येवून आपली आर्थिक पत समाजात निर्माण करावी, वैयक्तीक पातळीवर व गटाच्या माध्यमातून सामुहिक पातळीवर महिलांनी उदयोग धंदे करण्यासाठी पुढे यावे, याकरीता बँका व शासन आपल्या पाठीशी उभे आहेत, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
    याप्रसंगी नगरसेवक शहबाज काझी, राजलक्ष्मी गायकवाड, सुभद्रा मुळे, सुनिता मोरे आदींची भाषणे झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शब्बीरअली सावकार हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार सी.डी.एस.च्या अध्यक्षा संगिता गायकवाड यांनी केले.
    यावेळी उपनगराध्यक्षा अपर्णा बेडगे, मुख्याधिकारी टेंगळे पाटील, नगरसेविका कुशावर्ती शिरगुरे, सुलताना कुरेशी, नगरसेवक दयानंद बनसोडे, सामाजिक कार्यकर्त्या शाहेदाबी सय्यद सह महिला व नागरीक मोठया संख्येनी उपस्थित होते.
 
Top