ताज्या घडामोडी

बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शीच्या मानाच्या १७ वा पुठ्ठा गणपती मंदिराच्या अकराव्या दिवशीच्या मिरवणुकीने विसर्जन मिरवणुकांची सांगता झाली. औद्योगिक वसाहतीचे चेअरमन सुधीरभाऊ सोपल यांच्या हस्ते मानाच्या १७ वा पुठ्ठा गणपती मंदिरातील मूर्तीची आरती झाल्यानंतर बाळासाहेब आडके यांच्या हस्ते उत्सवमूर्तीची आरती करण्यात आली. ही मिरवणुक परंपरेनुसार सुमधुर संगीतात गुलालाविना व अत्यंत शिस्तीत मंगलमय वातावरणात काढण्यात आली. यावेळी गणपती मंदिरात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती.
   
    आठव्या दिवसापासून अकराव्या दिवशीच्या मानाच्या गणपतीच्या उत्सवमूर्तीचे विसर्जन होईपर्यंत सर्व मिरवणुका भक्तीमय वातावरणात शांततेत काढण्यात आल्या. या संपूर्ण अकरा दिवसांत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. बार्शी पोलिसांनी लावलेल्या शिस्तीमुळे चालू वर्षी डॉल्बीचा आवाज बंद झाला. दररोज येणार्‍या पावसाच्या सरी तसेच मिरवणुकीच्या दिवशी मुसळधार पावसाने मिरवणुकांची गर्दि कमी झाली. सार्वजनिक मंडळाच्या वतीने विविध १७ ठिकाणी पौराणिक देखावे सादर करण्यात आले. श्री गणेश विसर्जनादिवशी शांतता कमिटी, मुस्लिम बांधव व पोलिसांच्या वतीने सर्व मिरवणुकांचे प्रमुख असलेल्या पांडे चौक येथे श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. भर पावसात देखिल पोलिस उपाधिक्षक रोहिदास पवार, पोलिस निरीक्षक सालार चाऊस व त्यांचा बंदोबस्तातील सर्व स्टाफ तैनात होता. यावेळी लालबागचा राजा गणेश मंडळ, जय हनुमान गणेश मंडळ, आजोबा गणपती, शिवबा प्रतिष्ठाण, व्ही.एस.टी.गणेश मंडळ, वीर शिवाजी प्रतिष्ठाण, नृसिंग गणेश मंडळ यांच्या मिरवणुका निघाल्या.
    सुभाष नगर येथील तलावात मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी बार्शी नगरपरिषदेच्या अग्निशतन दलाचे एक पथव सुसज्ज वाहनासह उपस्थित होते. यावेळी स्वच्छता कर्मचार्‍यांकडून श्री गणेशाच्या निर्मार्ल्य वेगळ्या बाजूला काढण्यात आले. छोट्या गणेश मंडळाच्या मुर्ती विविध ठिकाणच्या विहीरींमध्ये विसर्जन झाले.
 
Top