उस्मानाबाद - अंध व अपंगांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि राज्य स्तरावर त्यांच्या प्रलंबित असणा-या  मागण्याबाबत पाठपुरावा करु. इतर समाजघटकानीही अंध व्यक्तींच्या रोजगार व त्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे प्रतिपादन  जिल्ह्याचे पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. 
   राष्ट्रीय दृष्टीहिन संघाच्या मराठवाडा शाखेने तुळजापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात  चव्हाण बोलत होते. माजी आमदार सि.ना. आलुरे गुरुजी, नगराध्यक्षा विद्या गंगणे, राष्ट्रीय दृष्टीहिन संघाचे राज्य उपाध्यक्ष रघुनाथ बारड, मराठवाडा विभागाचे महासचिव आत्माराम घोगरे, सोपानराव वडकर आदींची यावेळी उपस्थिती होती. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील अंध व्यक्ती या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

 चव्हाण यांनी यावेळी अंध व्यक्तींना येणा-या अडचणी आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. राज्य शासनाच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल, निराधार व्यक्तींना संजय गांधी निराधार योजनेंतर्गत लाभ दिला जातो. जिल्ह्यातील अंध व्यक्तींची संख्या लक्षात घेऊन तसेच त्यांची परिस्थिती विचारात घेऊन नगरपालिका, जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन यांच्या योजनाचा लाभ देता येईल का, याबाबत संबंधितांना आढावा घेण्यास सांगण्यात येईल, असे श्री. चव्हाण यांनी नमूद केले. शासन सुविधा देत असते, त्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी राष्ट्रीय दृष्टीहिन संघटनेनेही प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

सि. ना .आलुरे गुरुजी यांनी अंध व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना संधी देणे आवश्यक असल्याचे सांगितले.


प्रास्ताविकात  बारड यांनी अंध व्यक्तींना समाजात वावरताना येणा-या  अडचणी विशद केल्या.  घोगरे यांनी अंध व्यक्तींच्या समाजाकडून असलेल्या अपेक्षा तसेच शासन योजनांबाबत लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लुई ब्रेल आणि हेलन केलर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुश्पहार अर्पण करण्यात आला. शोभा जगताप व अंध विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले.
 
Top