उस्‍मानाबाद  - गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) या कायद्याची यशस्वी अमलबजावणी व्हावी, यासाठी अंगणवाडी कार्यकर्ती व मदतनीस, आशा, आरोग्यसेविका यांचे सहकार्य घ्यावे. लिंगनिदानासारख्या घटना होऊ नयेत म्हणून समाजातील सर्व घटकांनी दक्ष राहिले पाहिजे. अशा घटना घडत असतील तर त्या तातडीने निदर्शनास आणा, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी जे. टी. पाटील यांनी केले.
 येथील जिल्हाधिकारी कार्यालयात गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ (पीसीपीएनडीटी) अंतर्गत जिल्हास्तरीय दक्षता पथकाची बैठक श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा सरकारी वकील व्ही. बी. शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) श्री. नवले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. टी. एच. माने, डॉ. दत्तात्रय खुणे, विधी सल्लागार अ‍ॅड. उमा गंगणे आदींची यावेळी उपस्थिती होती.
जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी तसेच स्त्री भ्रृण हत्या रोखण्यासाठी या दक्षता समितीची स्थापना करण्यात आली आहे. स्त्री भ्रृण हत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना करणे, जनजागृती करणे, विविध सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करणे, सोनोग्राफी केंद्रांना अचानक भेटी देणे असे काम या दक्षता पथकामार्फत केले जाणार आहे. मुलगी नको ही मानसिकता बदलण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
 

 
Top