नळदुर्ग -:  शालेय विद्यार्थ्‍यांसाठी असलेल्‍या शालेय पोषण आहाराच्‍या धान्‍य व साहित्‍याचे बेकायदेशीररित्‍या साठा केल्‍याचे उघडकीस आले. माध्‍यमिक व प्राथमिकचे मिळून शासकीय दरानुसार एकूण 1 लाख 6 हजार 394 रुपये किंमतीचे 8 हजार 322 किलो धान्‍यसाठा नळदुर्ग येथील सय्यद अब्दुल्लाशहा मेमोरियल उर्दू प्राथमिक व माध्‍यमिक शाळा येथे आढळून आला. या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
    नळदुर्ग येथील सय्यद अब्दुल्लाशहा मेमोरियल उर्दू प्राथमिक व माध्‍यमिक शाळा हुतात्‍मा स्‍मारकासमोर आहे. या शाळेतील पाच खोल्‍यांमध्‍ये शालेय पोषण आहाराचे साहित्य ठेवले होते. याची माहिती मिळताच शालेय पोषण आहाराचे अधिक्षक एस.आर. गुरव, विस्‍तारा‍धिकारी जी.एन. सर्जे, एस.आर. नागमोडे, केंद्रपमुख भोरे एम.एस., गायकवाड पी.जी. यांनी शाळेला भेट देऊन रितसर पंचनाम्‍याची कारवाई केली. यावेळी माध्‍यमिक शाळेचा साठा नोंदवहीमध्‍ये प्रत्‍यक्ष शिल्‍लक धान्‍य नोंदीनुसार तर कंसात प्रत्‍यक्ष जादा आढळलेला धान्‍य पुढीलप्रमाणे आहे. तांदुळ 252 किलोग्रॅम (505 किलो), मूगदाळ 9.3 किलोग्रॅम (60 किलो), मटकी 15.190 कि. (70 कि.), हळद 8.516 कि. (14 कि.), मीठ 13.852 कि. (17 कि.), तेल 10.696 कि. (17 कि.), मिरची 13.852 कि. (18 कि.) असे एकूण माध्‍यमिकचे 377.168 किलोग्रॅम त्‍याची शासकीय दरानुसारची किंमत 10 हजार 537 रुपये तर प्राथमिक शाळेचे तांदुळ 30.500 कि. (7850 कि.), तुरदाळ निरंक (8 कि.), मूगदाळ 8.330 कि. (90 कि.), मोहरी 19 कि. (42 कि.), मीठ निरंक (20 कि.), तेल निरंक (43.39 कि.), वटाणा निरंक (40 कि.), मिरची 5.667 कि. (224.33 कि.) असे एकूण 7945.39 किलोग्रॅम, किंमत 95 हजार 857 रुपये असे मिळून प्राथमिक व माध्‍यमिक शाळेचा बेकायदेशीर साठा 8322.558 किलोग्रॅम वजनाचे धान्‍य व साहित्‍य, एकूण किंमत 1 लाख 6 हजार 394 रुपये मुद्देमालाचा पंचनामा करुन शालेय पोषण आहार अधिक्षक एस.आर. गुरव (पंचायत समिती तुळजापूर) यांनी बेकायदेशीर धान्‍य साठयाला सिल करुन वरिष्‍ठाकडे या प्रकरणाचा अहवाल पाठविणार असल्‍याचे सांगितले.
उर्दु शाळेतील विदयार्थ्‍यांची उपस्थिती वाढावी व चांगल्‍या आरोग्‍यासाठी सकस आहार देऊन सर्व शिक्षण अभियानांतर्गत शासनाने मध्‍यान्‍ह भोजनाची चांगली संकल्‍पना सुरु केली असली तरी या योजनेचा धान्‍य माफियांनी पार बट्टयाबोळ करुन आपले उखळ पांढरे करण्‍याचे कट रचले असले तरी सुज्ञ नागरिकांनी हे प्रकरण शालेय पोषण आहार अधिक्षकांच्‍या कानावर घातल्‍याने बेकायदेशीर मार्गाने पैसे कमविण्‍याच्‍या तथाकथित गैरप्रकार करणा-याच्‍या मनसुब्‍यावर पाणी फिरले आहे. पंचनाम्‍याच्‍यावेळी पोलीस उपनिरीक्षक मुबारक शेख, शालेय व्‍यवस्‍थापन समितीचे अध्‍यक्ष कुरेशी अहमद हुसेन, संस्‍था सचिव प्रा. जावेद काझी यांच्‍यासह शाळेचे मुख्‍याध्‍यापक, शिक्षक, कर्मचारी, गावातील नागरीक उपस्थित होते.
     पोषण आहाराच्‍या अभिलेखावर शिक्षण विभागाच्‍या कुठल्‍याही अधिका-याचे शेरा व शिक्‍का नसल्‍याचे आढळून आले. शालेय परिसर अस्‍वच्‍छ असल्‍याचे आढळून आले.
 
Top